याबाबत अधिक माहिती अशी की, अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांनी पथक नेमून कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार शनिवार, १६ मार्च रोजी दुपारी १ वोच्या सुमारास मंडळ अधिकारी रमेश वंजारी, तलाठी मनोहर बाविस्कर, ज्ञानेश्वर माळी, विरेंद्र पालवे हे गस्त घालत असताना वाघ नगर थांब्याजवळ त्यांना लाल रंगाचे विना क्रमांकाचे एक ट्रॅक्टर वाळू वाहतूक करताना आढळले. ट्रॅक्टर चालक गजाराम बारेला (रा. हरिविठ्ठल नगर) याला वाळू वाहतूक परवान्यासंदर्भात विचारले असता त्याच्याकडे परवाना नव्हता.
हे ट्रॅक्टर पुढील कारवाईसाठी जप्त केलेले जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नेण्यासाठी मंडळ अधिकारी वंजारी हे ट्रॅक्टरमध्ये बसले व इतर कर्मचारी दुचाकीवर जात असताना रामानंद नगर घाटाच्या पायथ्याशी ट्रॅक्टर मालक अमर सोनवणे व जितेंद्र सोनवणे (दोन्ही रा. समतानगर) आले व त्यांनी ट्रॅक्टर थांबवून महसूल पथकाशी अरेरावीची भाषा व दादागिरी करीत मंडळ अधिकाऱ्यांना ट्रॅक्टरवरून खाली ओढले आणि धमकी देवून वाळूने भरलेले ट्रॅक्टर पळवून नेले. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
