शिरपूर तालुक्यातील कूवे येथे वादळी पावसाने पिके भुईसपाट; शेतात काढून ठेवलेल्या पिकांचे नुकसान

फुले शाहू आंबेडकर
0
तालुक्यातील कुवे परिसरात शुक्रवारी (ता.१) दुपारी वादळ आणि पावसामुळे शेतीला मोठा फटका बसला. शेतातून काढून ठेवलेला शेतमाल जमिनदोस्त झाला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, महसूल विभागाने तातडीने पंचनामे करुन नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केली जात आहे. 
कुवे परिसरात शुक्रवारी दुपारी साडेतीनला वादळ व पाठोपाठ पावसाने अर्धा तास धुमाकूळ घातला. अचानक आलेल्या अस्मानी आपत्तीमुळे शेतकरी भांबावून गेले. त्यांच्या डोळ्यादेखत तयार झालेला शेतमाल हवेत उधळला गेला. पाठोपाठ उभी पिकेही कोलमडून पडली. कष्टाने फुलवलेला शेतमाल वाहून जाताना पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.
मका, हरभरा, बाजरी, गहू, ज्वारी आदी पिकांसाठी कुवे परिसर प्रसिद्ध आहे. मक्याच्या पेरणीला तीन महिने पूर्ण झाले आहेत. यंदा दीर्घकाळ थंडी असल्यामुळे गहू आणि हरभराही जोमात होते. काही ठिकाणी कापणी करुन पिके वाळवण्यासाठी बांधावर, खळ्यात ठेवली होती.
उर्वरित पिके काढणीच्या अवस्थेत होती. वादळाने बांधावरील शेतमाल उडवून नेला तर शेतातील उभी पिके जमीनदोस्त केली. हाताशी शिल्लक शेतमाल वेचून सुरक्षित ठिकाणी नेण्यात शेतकरी गुंतले आहेत. दरम्यान, परिसरात अद्यापही अभ्राच्छादित वातावरण असल्याने बळिराजा चिंतेत आहे.
रामसिंह राजपूत, रतिलाल पाटील, नरेंद्र राजपूत, भीमसिंह राजपूत, प्रल्हाद चौधरी, जयसिंह राजपूत, सुनील चौधरी, हिरालाल गुजर, नारायण राजपूत (सर्व मका), प्रल्हाद चौधरी (बाजरी), सुभाष चौधरी (हरभरा व ज्वारी), ज्ञानेश्वर मराठे (गहू).

"शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. यंदा पिके जोमात असल्याने मागील नुकसान भरुन निघेल, अशी अपेक्षा होती. पण, अस्मानी आपत्तीने शेतकऱ्यांच्या आशा धुळीस मिळवल्या. महसूल विभागाने तातडीने पंचनामा करुन नुकसानभरपाईसाठी प्रयत्न करावेत."

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default