माणसानं इतिहासाच्या एका टप्प्यावर मानवमुक्तीचं, शोषणमुक्तीचं स्वप्न पाहण्यास सुरुवात केली. राजेशाही, जातिव्यवस्था, भांडवलशाही, हुकूमशाही, फॅसिझम अशा सर्व गोष्टी जगामध्ये मानवी समाजाला भोगाव्या लागल्या. बहुसंख्य माणसांनी संघर्ष करून राजेशाही संपविली; पण जातिव्यवस्था संपू शकली नाही. तिचं कडवं स्वरूप बदलण्याची प्रक्रिया सुरू केली. स्त्रीमुक्तीची चळवळ सुरू केली.
अशा सगळ्या प्रक्रियेत जगामध्ये १९७० च्या दशकामध्ये जगभर तरुण, मुलामुलींचं नवं वादळ यायला सुरवात झाली. सर्व प्रकारची बंधनं, कुटुंबाचा अडथळा, समाजाची रूढी झुगारून ही मुलं जग बदलायला निघाली. याच पद्धतीनं या देशात आमच्यासारखी पिढी निर्माण झाली. तिनं वर्ग, जात, भेदभाव, धर्मभेद या आधारावरचं सर्व शोषण संपवण्यासाठी सर्वांगीण उठाव केला.
वैयक्तिक विकासाच्या मोठ्या शक्यता दिसत असताना सुद्धा पूर्णवेळ या देशातल्या त्या वेळच्या मुलामुलींनी जनचळवळी उभारायला सुरुवात केली; पण हा उठाव सकारात्मक होता. नवं जग कसं असणार? याचं स्वप्न पाहणारा उठाव होता आणि हे नवं जग आजच्या जगातूनच सुरू होणार आहे. या जाणतेपणानं प्रत्यक्ष सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये बदल घडवून आणणाऱ्या चळवळी त्यांनी केल्या. लिखाण केलं, पुस्तकं लिहिली, कविता लिहिल्या. जी जनता खाली मान घालून जगत होती, तिला स्वप्न पाहायला शिकवलं.
जनतेचं धरण जनतेच्या ताब्यात आहे. दर वर्षी बलिप्रतिपदेला ‘इडापिडा जावो बळीचे राज्य येवो’ असा घोष करणारा वर्धापन दिन साजरा करत आहोत.
चळवळीनं काही ऐतिहासिक प्रयोगही केले. साताऱ्याच्या प्रतिसरकारचे सेनानी आणि प्रतिसरकारचे कार्यकारिणीचे प्रमुख नेते क्रांतिवीर बाबूजी पाटणकर यांच्या स्मरणार्थ स्थापन झालेल्या संस्थेनं चळवळीचा भाग म्हणून स्टील आणि सिमेंट काँक्रिटच्या साहाय्याने बांधल्या जाणाऱ्या आजच्या पारंपरिक आरसीसी बांधकामाला पर्याय देण्याचा प्रयोग केला.
स्टीलऐवजी तीन इंच व्यासाच्या; पण प्रक्रिया करून टिकाऊ बनविलेल्या सुरुच्या लाकडाच्या आधारे आरसीसीला लाजवेल असे ३० X २० फूट क्षेत्रफळाचे फ्रेम स्ट्रक्चर उभे केले. ते अनेक वर्षे तीन टनांचा बोजा सहन करून टिकले. आज ३५ वर्षे कोणतीही पडझड न होता ही इमारत दिमाखाने उभी आहे. या पद्धतीनं जर इमारती बांधल्या, तर त्या दुमजलीही होऊ शकतात. याचाही प्रयोग करून दाखविला.
सरकारनं स्टीलऐवजी अशाप्रकारे लाकडाचा उपयोग फ्रेम स्ट्रक्चर करण्यास आणखी बळ दिले आणि सार्वत्रीकरणाचे धोरण घेतले, तर शेतकऱ्यांच्या बांधावर सहजच येणारी झाडे जळणावारी जाण्याऐवजी स्टीलच्या खालोखाल मिळणाऱ्या दरानं बांधकाम उद्योगाचा कणा बनू शकतात. यासाठी सुद्धा शेतकऱ्यांच्या चळवळीचा आधार होणारे तंत्रज्ञान तयार होणं हा चळवळीचा भाग म्हणून यशस्वीरीत्या केलं गेलं आहे.
हजारो किलोमीटरचे रस्ते महामार्गाच्या नावाखाली देशभर चालू आहेत. लाखो किलो स्टील, सिमेंट यासाठी खर्च होत आहेत. खासगी कंपन्या जनतेच्या उरावर बसत आहेत. हेच रस्ते तीन इंचाचं लाकूड किंवा बांबू आणि नायलॉनच्या धाग्याला पर्याय होऊ शकणारे प्रक्रिया केलेले नैसर्गिक धागे यांच्या ग्रीडच्या आधारावर आजच्यापेक्षा मजबूत होऊ शकतात.
यातून भांडवलदारांची गरजच संपेल आणि पृथ्वीच्या पोटात असलेले धातू कधीतरी संपल्यावर काय करायचं? पेट्रोलियम संपल्यावर काय करायचं? या भीतीला सडेतोड उत्तरही मिळू शकतं आणि रोजगारासाठी मुंबई, पुण्याला जाऊन झोपडपट्ट्यांत आणि चाळींच्या खुराड्यात राहून जगण्याची वेळसुद्धा संपविली जाऊ शकते. चळवळीनं हे मुद्दे राष्ट्रीय भविष्यदर्शी चर्चेच्या केंद्रस्थानी आणले आहेत.
आज लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यामध्ये अशा मूलभूत मुद्द्यांची चर्चा निश्चितच होणार नाही. आमचं स्वप्न - चळवळीतील जनतेचं स्वप्न हे निवडणुकीच्या कक्षा भेदून भविष्याचा वेध घेणारं आहे. निवडणुका येतील आणि जातील, अशी स्वप्नं जोपर्यंत जिवंत आहेत, तोपर्यंत नवनिर्मिती करणारी कष्टकरी जनता ही या जगामध्ये पायाभूत बदल घडवीतच राहणार आहे.
