याप्रकरणी तीन महिलांसह 11 जणांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 2) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील साबळेवाडी येथे घडली.
गणेश बाळासाहेब साबळे, नामदेव बबन साबळे, चांगदेव बबन साबळे, संदीप नामदेव साबळे, भरत भाऊसाहेब साबळे, बाळराजे चांगदेव साबळे, बापू चांगदेव साबळे, पेटवून घेणाऱ्या तीन महिला आणि अन्य एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी खेड/राजगुरूनगर भूमी अभिलेख कार्यालयातील परीक्षण भूमापक धनंजय ठाणेकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ठाणेकर आणि त्यांचे सहकारी साबळेवाडी येथे शासकीय मोजणी करत होते. त्यावेळी तिथे आरोपी आले. त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोजणी करण्यास विरोध केला. धनंजय ठाणेकर यांनी आरोपींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी मोठमोठ्याने आरडाओरडा करून शासकीय कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. एका मदतनीसाला धक्काबुक्की केली.
