जळगाव : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे रविवारी जिल्हा दौऱ्यावर आले होते. विमानतळावर आगमन झाल्यानंतर शरद पवारांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. बैठकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या एका नेत्याने एकनाथ खडसे हे आले नसल्याचे सांगताच पवारांनी खडसेंचा विषय काढू नका, ते आपल्यात कोठे आहेत? असे म्हणत तो विषय थांबवण्याचे सांगितले.
बैठकीत शरद पवार यांच्यासह विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे, विकास पवार, वाल्मिक पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील आदी उपस्थित होते
शरद पवार यांनी या बैठकीत रावेर लोकसभा मतदारसंघासोबतच जळगाव लोकसभा मतदारसंघाची माहिती घेतली. एकनाथ खडसे यांच्याबाबत काही नेत्यांनी विषय काढला. मात्र, संबधित नेत्यांना थांबवत, त्यांच्याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक नसल्याचे सांगत. निवडणुकीची काय तयारी आहे? याबाबतच आपण बोलू असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
