नांदेड : अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या दाम्पत्याचा सुखी संसाराचा अत्यंत भयंकर शेवट झाला आहे. शेतातील आखाड्यावरील लोखंडी ॲंगलला गळफास लावून नवविवाहित दांम्पत्याने आपली जीवन यात्रा संपवली. मन सुन्न करणारी घटना जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील कळकावाडी येथे मंगळवारी मध्यरात्री घडली. नामदेव उद्धव केंद्रे (२१) आणि कोमल नामदेव केंद्रे (१९) असं मृत दाम्पत्याचं नाव आहे. या नवदाम्पत्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र या घटनेने कळकावाडी गावात शोककळा पसरली आहे
कळकावाडी येथील रहिवासी नामदेव उद्धव केंद्रे यांचा विवाह शेल्लाळी येथील किशन गित्ते यांची मुलगी कोमल हिच्याशी १७ फेब्रुवारी रोजी झाला होता. दोघांच्याही संसाराला चांगली सुरूवात झाली होती. हसत - खेळत त्यांचा संसार सुरु होता, मात्र त्यांच्या या सुखी संसारात असं काही वादळ येईल असं कोणालाही वाटलं नसेल. २३ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नामदेव आणि कोमल हे दोघे कळकावाडी येथील आपल्या शेतात गेले होते. या ठिकाणी आखाड्यावरील लोखंडी अँगलला गळफास लावून आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी शेतात आलेल्या नातेवाईकांना दोघांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला
या घटनेची माहिती मिळताच कंधारचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे, बीट जमादार गित्ते, पोलीस कॉन्स्टेबल जुन्ने यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दोन्ही मृतदेहावर कंधार ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
