शहरातील नवीन बसस्थानकाशेजारील भजे गल्लीत ३५ वर्षीय गृहस्थ बेशुद्धावस्थेत मिळून आले होते. जिल्हापेठ पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी धाव घेत त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासणीनंतर मृत घोषित केले. पोलिस उपनिरीक्षक गोकुळ काशीनाथ गवारे (वय ३५) असे मृताचे नाव आहे
गोकुळ गवारे (रा. चित्तेगाव, ता. निफाड, जि. नाशिक) हे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलिस नियंत्रण कक्षात उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात परिसरातील व्यावसायिकांनी माहिती कळविल्यावर पोलिस नाईक मिलिंद सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत हॉटेल प्रीतमसमोरून गवारे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
डॉ. सचिन पाटील यांनी तपासणीअंती मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिस उपअधीक्षक संदीप गावित, निरीक्षक राकेश मानगवार आदींनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
उपनिरीक्षक गवारे यांचा नेमका कशामुळे मृत्यू झाला, याचे कारण अद्याप समोर आलेले नसून, शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. जिल्हापेठ पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, उपनिरीक्षक मीरा देशमुख तपास करीत आहेत.