पुण्यातील क्राईम न्यूज:मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय उघडकीस, 3 मुलींची सुटका; वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा
उच्चभ्रु समजल्या जाणाऱ्या काेरेगाव पार्क परिसरात एका मसाज पार्लरच्या नावाखाली सुरु असलेला वेश्याव्यवसाय पाेलीस छाप्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दाेन महिलां विराेधात काेरेगाव पार्क पाेलीस ठाण्यात पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पश्चीम बंगाल, नागालँड व पुणे येथील तीन तरुणींची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आली आहे
पाेलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, काेरेगाव भागात हरमेश विलाश इमारतीत तिसऱ्या मजल्यावर विवा स्पा नावाचे मसाज पार्लर अाहे. सदर ठिकाणी सुरु असलेला वेश्याव्यवसायाची माहिती पाेलीसांना मिळालेली हाेती. त्यानुसार एक बनावट ग्राहक सदर स्पा सेंटर मध्ये पाठवून पाेलीसांनी माहितीची खातरजमा केली. त्यानंतर संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला असता वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे दिसून अाल्याने दाेन महीलांवर गुन्हा दाखल करण्यात अाला. तर, तीन तरुणींची सुटका करण्यात अाली. अाराेपी महिला या मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसायातून मिळणाऱ्या पैशावर स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे निष्पन्न झाले अाहे. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पाेलीस निरीक्षक अश्विनी सातपुते करत अाहे.बसची वाट पाहताना महिलेचा विनयभंग
पुणे शहरातील एफसी रस्त्यावर वाडेश्वर हाॅटेल समाेर बसस्टाॅपवर घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत असलेल्या एका महिलेच्या शरीरास अाक्षेपार्ह स्पर्श करुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न हाेईल असे कृत्य एका तरुणाने केले. याप्रकरणी पिडित महिलेने अाराेपी श्रावण छबीलाल जैसवार (वय-३५,रा.वारजे माळवाडी, पुणे) याचे विराेधात विनयभंगचा गुन्हा दाखल केला आहे.
विचित्र अपघातात कॉलेज तरुणी गंभीर जखमी
मामा सोबत कॉलेजला निघालेल्या तरुणीचा विचित्र अपघात झाल्याची घटना लोणीकाळभोर परिसरात घडली. या अपघातात तरुणीच्या खुबे आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी शिवराम कराड हे सोमवारी (दि १०) रोजी भाची ज्ञानेश्वरीला कॉलेजला सोडण्यासाठी लोणीवरून हडपसरला दुचाकीवरून निघाले होते. यावेळी दत्ताराम कांबळे हा बेदरकारपणे दुचाकी चालवत सर्व्हिस रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर आला आणि त्याने कराड चालवत असणाऱ्या दुचाकीला धडक दिली. यामुळे शिवराज कराड हे रस्त्याच्या उजव्या बाजूला तर ज्ञानेश्वरी डाव्या बाजूला पडली. यावेळी पाठीमागून येणाऱ्या पीएमपीने ज्ञानेश्वरीला १० ते १२ फूट फरफटत नेले. यात ज्ञानेश्वरीचे दोन्ही खुबे तसेच मणक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच फिर्यादी शिवराज कराड हे किरकोळ जखमी झाले. प्रकरणी ऍक्टिव्हा चालक दत्ताराम कांबळे आणि पीएमपी चालक सोमनाथ बसाटे यांच्यावर गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार एस कुंभार करत आहेत.
वेगवेगळ्या अपघातांत दोन जणांचा मृत्यू
पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातांत दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. तर, घोरपडी गाव परिसरात दुचाकीच्या धडकेत सायकलस्वार मृत्युमुखी पडला.मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वारजे भागात भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात दुचाकीस्वार ओंकार भिकन गुप्ता (वय ३३, रा. राजीव गांधीनगर, बिबवेवाडी ) यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाविरुद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तर घोरपडी मधील भारत फोर्ज कंपनी रस्त्यावर दुचाकीच्या धडकेत सायकलस्वार मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. गोकुळ भानूदास सूर्यवंशी (वय ४७) असे मृत्युमुखी पडलेल्या सायकलस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
