उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत सोनवणे, पोलिस निरीक्षक दीपक पाटील तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. शिंदखेडा पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक विजय ठाकूर हे सहकारी कुणाल फुलपगारे यांच्यासह शहरात बुधवारी सकाळी गस्त घालत असताना गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती विनोद देसले यांनी पोलिसांना दिली. गस्त पथक तत्काळ रज्जाक नगर येथे दाखल झाले असता परिसरातील रहिवासी अस्लम हैदर शेख त्याच्या साथीदारांसह राहते घराच्या बाजूला पत्री शेडमध्ये मांस कब्जात बाळगून त्याची चोरटी विक्री करीत असल्याचे आढळले.
पोलिस येत असल्याची खबर मिळताच अशफाक हमीद कुरेशी, साजिद हमीद कुरेशी (दोघे रा. कुरेशी वाडा शिंदखेडा), शेख जहांगीर शेख हैदर (रा. रज्जाक नगर) हे तिघे घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी अस्लम यास ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत वरील तिघांच्या मदतीने मांसाची विक्री करत असल्याचे सांगितले.
विनोद देसले, केशव माळी, सुभाष माळी, राजेंद्र मराठे, भुपेंद्रसिंग राजपूत, सुरेंद्र देसले, कुणाल माळी, रवींद्र माळी यांच्या समक्ष पंचनामा केला. जप्त मांस पैकी काही मांस हे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) संकेत पुपलवार यांनी तपासणी करता घेतले. उर्वरित मांस व इतर साहित्य हे पंचांसमक्ष पोलिस स्टेशनला आणले. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
