योगिनी संतोष जाधव (वय 19 , जाधववस्ती, जिरेगांव ता-दौंड जि-पुणे ) असे या आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून नवरा संतोष बबन जाधव व सासू मंगल बबन जाधव अशी आरोपींची नाव आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, योगीनी हिचे संतोष जाधव याच्यासोबत ६ डिसेंबर २०२३ रोजी लग्न झाले होते.
लग्नानंतर सासु आणि नवरा तुला स्वयंपाक करता येत नाही, घरातील कामे करता येत नाही, तु माहेरी सारखे फोन करते, तसेच तुझे बाळंतपणासाठी तू तुझ्या वडीलांकडून पैसे आणायचे असे म्हणून वारंवार त्रास देऊन शिवीगाळ करुन मारहाण करीत होते. त्यामुळे ती गरोदर असताना १२ एप्रिल २०२४ रोजी घरातून निघून गेली होती. याबाबत तिचे पती संतोष याने दौंड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. तेव्हांपासून योगीनी ही बेपत्ता होती.
मात्र योगीनी हिचा मृतदेह रविवारी (दि. २) जिरेगाव येथील झाडाझुडपात गळपास घेतलेल्या अवस्थेत आढळला. योगिनी हिचे वडील सुभाष आनंदराव चव्हाण यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने नवरा आणि सासूच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती पोलीस निरीक्षक डोके यांनी दिली आहे
