याबाबत सविस्तर माहिती अशी की, नातेवाईकांनी लग्नाला विरोध केल्याने आधी प्रेयसीची हत्या करुन प्रियकराने स्वतः आत्महत्या केल्याची घटना पुणे शहरातील हडपसर भागात घडली. मोनिका कैलास खंडारे असे खून झालेल्या तरुणीचे नाव तर आकाश अरुण खंडारे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मोनिका आणि आकाश मूळचे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्याचे राहणारे आहेत. दोघे नातेवाईक असून त्यांचे प्रेमसंबंध होते. मोनिका आणि आकाशच्या प्रेमसंबंधाला कुटुंबीयांचा विरोध होता. आकाश शेती करायचा तर मोनिका नोकरी करत होती. दोघे ही गावाहून पुण्यात पळून आले होते.
शहरातील स्पॉटलाईट हॉटेलमध्ये दोघांनीही खोली भाड्याने घेतली होती. १३ मे रोजी मध्यरात्री आकाशने मोनिकाचा चादरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने खोलीतील पंख्याला चादर बांधून गळफास घेतला. याबाबतची माहिती हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलीस तपासात हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे. या भयंकर घटनेने पुणे शहर हादरुन गेले आहे.
