ग्रामनिधीची अफरातफर; चौकशीच्या नावावर ग्रामस्थांची दिशाभूल

फुले शाहू आंबेडकर
0
तालुक्यातील वडेगाव येथे सामान्य फंड व १५ व्या वित्त आयोग निधीची सरपंच व सचिवाने विल्हेवाट लावली. या संदर्भात इतर  ग्राम पंचायत सदस्यांना विश्वासात घेण्यात आले नाही. साहित्य खरेदीचा कांगावा करण्यात आला. परंतु, साहित्य गावात कुठे लावण्यात आले, हे दिसून येत नाही. यामुळे निधीची अफरातफर झाल्याची तक्रार ग्राम पंचायत सदस्य व माजी उपसरपंचाने वरिष्ठाकडे केली. परंतु, या प्रकरणी चौकशी करण्याऐवजी अधिकार्‍यांकडून गावकर्‍यांची दिशाभूल केली जात आहे. जनप्रतिनिधीच्या दबावाखाली चौकशी थंडबस्त्यात पडून असल्याचे बोलले जात आहे. यामुळे तक्रार व ग्राम पंचायत सदस्य आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
वडेगाव येथे जनप्रतिनिधींच्या दबावाने चौकशी थंडबस्त्यात
वडेगाव येथील सरपंच शामराव बिसेन व ग्रामसेवक जे.बी. तिडके यांनी संगनमत करून कोणत्याही सदस्याला विश्वासात न घेता आपल्या मनमर्जीने वाटेल तिथे सामन्य फंड व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीची परस्पर विल्हेवाट लावली. त्याचप्रमाणे गावात पाणी पुरवठ्याची कामे, रोजगार हमी योजनेतून निकृष्ट दर्जाचे सिमेंट रस्ता बांधकाम व इतर साहित्य खरेदीमध्ये निधीची अफरातफर करण्यात आली. असा आरोप उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनी केला. या संदर्भात माजी उपसरपंच सिबीर चोले यांनी वरिष्ठ कार्यालयात तक्रार केली. तसेच माहिती अधिकार अधिनियमातंर्गत माहिती घेण्यासाठी अर्ज केला. परंतु, यावरही ग्रामसेवकाने माहिती देण्यास टाळाटाळ करून अधिनियमाची अवहेलना केली ग्राम पंचायतीतील हा भ्रष्टाचार दै.देशोन्नतीने वृत्त मालिकेच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणला.
तक्रारदार व सदस्य आंदोलनाच्या पवित्र्यात
बातमी प्रकाशित होताच खंडविकास अधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशी अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी बडोले यांची नेमणूक करण्यात आली. परंतु, चौकशी कागदापुरतीच करण्यात आल्याची चर्चा सुरू झाला आहे. जनप्रतिनिधी या प्रकरणी दबावतंत्र आणून प्रकरणावर पांघरूण घालण्याचे काम करीत आहेत. यामुळे अधिकार्‍याकडून चौकशी थंडबस्त्यात पडून राहिली आहे. चौकशी करून दोषींवर कारवाई होत नसल्याने तक्रारदार व ग्राम पंचायत सदस्य आंदोलनाच्या पवित्र्यात असून ग्राम पंचायत कार्यालयासमोर आंदोलनावर बसणार, असा इशारा दिला आहे. यामुळे चौकशी अधिकार्‍याच्या अहवालाकडे वडेगावसह तालुक्याचे लक्ष लागले आहे.
चौकशीच्या नावाखाली लिपापोती
ग्राम पंचायत  वडेगाव येथे सामान्य फंड व १५ वा वित्त आयोग अंतर्गत साहित्य खरेदीत मोठी आर्थिक अफरातफर करण्यात आली आहे. याची तक्रारही करण्यात आली. तक्रारीची दखल घेवून खंडविकास अधिकारी यांनी ७ जून रोजी विस्तार अधिकारी बडोले यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेले बडोले हे दुपारी १ वाजता वडेगाव येथे दाखल झाले. यानंतर चौकशी करून ४ वाजता परतले. परंतु, काय चौकशी केली, याची साधी माहिती तक्रारकर्त्यांना देण्यात आली नाही. पुढील तारीख समोर करून अधिकारी परतले. यामुळे चौकशी नावावर प्रकरणावर लिपापोती तर केली जात नाही, चौकशी अधिकार्‍यांवर दडपण आणले जात आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
कर्तव्यदक्ष मुकाअ लक्ष देणार का?
जिल्हा परिषदेला  कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून मुख्य कार्यपालन अधिकारी मुरूगानंथम लाभले आहेत. त्यांच्या कामांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यामुळे वडेगाव येथील निधी अफरातफर प्रकरण आणि चौकशीला घेवून अधिकार्‍यांची लेटलतिफीमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. यामुळे वडेगाव येथील निधी अफरातफर प्रकरणात मुकाअ मुरूगानंथम लक्ष घालतील काय? असा प्रश्न निर्माण केला जात आहे. मुकाअ यांनी लक्ष देवून भ्रष्टाचारांवर कारवाई करावी, अशीही मागणी तक्रारदार व गावकर्‍यांकडून केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default