दुचाकीसह मोबाईल हस्तगत; एलसीबीची कारवाई

फुले शाहू आंबेडकर
0
स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची उकल करत चोरट्याला जेरबंद केले. त्याच्याकडून दुचाकीसह मोबाईल असा एकूण ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमालही हस्तगत केला. शहरातील चक्करबर्डी रोडवरील भाईजी नगर (प्लॉट क्रमांक-५०) येथील रहिवासी अंकीत दिलीप अग्रवाल हे २१ एप्रिलला रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास सुझुकी कंपनीच्या अ‍ॅक्सेस-१२५ स्कुटीने शहाद्याकडून धुळ्याकडे येत होते.
त्यादरम्यान ते हॉटेलवर जेवणासाठी थांबले असता अज्ञात व्यक्तीने त्यांची दुचाकी व त्यात ठेवलेला मोबाईल लंपास केला. याप्रकरणी सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा समांतर तपास एलसीबीकडून सुरू असताना नगावबारी परिसरात एकजण चोरीची दुचाकी विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाल्याने एलसीबीचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संशयितास नगावबारी परिसरातून ताब्यात घेतले.
त्याने त्याचे नाव धनराज सुरसिंग भिल (वय-२५, रा. सायने, ता. धुळे, ह.मु. पांझरा नदीकिनारी, मरिमाई भिलाटी, धुळे) असे सांगितले. चौकशीत त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी व पाच हजारांचा मोबाईल त्याच्याकडून पोलिसांनी जप्त केला. संशयितास पुढील तपासासाठी सोनगीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
त्याच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक श्री. पवार, पोलिस उपनिरीक्षक योगेश राऊत, मुकेश वाघ, चेतन बोरसे, पंकज खैरमोडे, शशी देवरे, हर्शल चौधरी, जितेंद्र वाघ, महेंद्र सपकाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default