डामरखेडाजवळील गोमाई नदीवरील पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. सदर वाहतूक प्रकाशा-काथर्दे-भादे- पिंगाने-शहादामार्गे वळविण्यात आलेली आहे. सर्व अवजड वाहने शहादा शहरातील खेतिया रस्त्याने जात असल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून तलावाचे स्वरूप प्राप्त झालेले होते.
दररोज अपघाताचे प्रमाण वाढले होते. शाळकरी विद्यार्थी रस्त्यावरील खड्ड्यात पडत होते. शहरातील नागरिक व वाहनधारकांचा रोष कमालीचा वाढत होता. सदर रस्ता पाडळदा चौफुलीपासून लोणखेडा बायपासपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याने नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले होते.
गेल्या दोन महिन्यांपासून रस्ता दुरुस्तीबाबत विविध सामाजिक संघटनांनी नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी केलेली होती. परंतु, दखल घेतली जात नव्हती. शेवटी नागरिक व वाहनधारकांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला.
