शिरुर : शिरुर हवेली मतदार संघातील आमदार पुत्र मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी हा महाविकास आघडीचे उमेदवार अशोक पवार यांचा कार्यकर्ता आहे. तर आमदार पुत्र ऋषीराज पवारचा तो मित्र आहे. लोकसभा निवडणुकीत डॉ.अमोल कोल्हे यांचा तो बूथ प्रमुखही होता. यामुळे अशोक पवारांनी या गोष्टीच राजकीय भांडवल करू नये असा थेट इशारा शिरुर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष रवी बापू काळे यांनी दिला आहे.
शिरूर हवेली मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. त्याला जबरीने विवस्त्र करून एका महिलेसोबत आणून त्या महिलेला विवस्त्र करून फोटो काढण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा इथं सर्व प्रकार घडला. आमदार अशोक पवार यांच्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आली होती. ऋषीराज पवार असे आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे नाव आहे. ऋषीराज पवार हा घोडगंगा साखर कारखाण्याचा चेअरमन सुद्धा आहे.
काहीजण आपल्या पक्षात प्रवेश करणार आहेत असं सांगून आमदार अशोक पवार यांचा मुलगा ऋषीराजला भाऊ कोळपेसह इतर दोन अनोळखी लोक घेऊन गेले. दुचाकीवरून ऋषीराजला एका बंगल्यात नेलं. तिथं बेडरूममध्ये डांबून ठेवलं आणि मारहाण करण्यात आली. तसंच गळा आवळून त्याला कपडे काढायला लावले. तेव्हा एका अनोळखी महिलेला बोलावून तिलाही विवस्त्र करण्यात आलं. तिच्यासोबत अश्लील कृत्य करायला लावून त्याचा व्हिडीओ शूट केला आणि तो व्हायरल करण्याची धमकी देत १० कोटींची खंडणी मागण्यात आली.
