फलटणमध्ये उद्या रविवारी होणाऱ्या कृतज्ञता समारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटण दौऱ्यावर येत आहेत. त्याचवेळी फलटण शहर पोलिस स्टेशनच्या इमारतीचे उद्घाटन होणार होते. मात्र, डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येमुळे तो कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, कृतज्ञता समारंभ हा डॉक्टर तरुणीने आत्महत्या केलेल्या मधुदीप हॉटेलसमोरील यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या मैदानावर होणार असल्याने विरोधकांची काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे देखील महत्वाचे आहे. पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने याने चारवेळा बलात्कार केला असून, प्रशांत बनकर याने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे हातावर लिहून फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीने हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. अशातच मुख्यमंत्री रविवारी फलटणमध्ये येत आहेत. घटनेपुर्वीच कार्यक्रमाचे नियोजन झालेले होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्या उपस्थित राहणार आहेत. कृतज्ञता समारंभावर होते अनिश्चिततेचे सावट डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येवरून सध्या राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच वैद्यकीय अहवाल बदलून देण्यासाठी दबाव आणला जात होता, असा आरोप देखील होत आहे. या आरोपाच्या माध्यमातून माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडे अंगुली निर्देश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर फलटणमधील नियोजित विकासकामांचे उद्घाटन आणि कृतज्ञता समारंभावर आज सायंकाळपर्यंत अनिश्चिततेचे सावट होते. रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांचा दौरा निश्चित झाला. मात्र उद्घाटनाचे कार्यक्रम रद्द करून केवळ कृतज्ञता समारंभ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसच संशयित आरोपी असल्याचे उद्घाटन रद्द फलटण दौऱ्यामध्ये फलटण शहर पोलिस स्टेशनच्या नव्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार होते. परंतु, डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षकच मुख्य संशयित आरोपी असल्याने उद्घाटन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. फक्त उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कृतज्ञता समारंभ होणार आहे. पण, हा कृतज्ञता समारंभ ज्या मैदानावर होणार आहे, त्या मैदानाच्या समोरील मधुदीप हॉटेलच्या लॉजमध्येच डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली आहे. अजित पवारही रविवारी सातारा दौऱ्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील रविवारी सातारा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. सकाळी साडे दहा वाजता हेलिकॉप्टरने त्यांचे वाई तालुक्यातील हेलिपॅडवर आगमन होईल. त्यानंतर एकसर (ता. वाई) येथे होणाऱ्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी फलटणमधील घटने संदर्भात अजितदादा पवार यांची प्रतिक्रिया समोर येईल.
डॉक्टर तरुणीने आत्महत्या केलेल्या हॉटेलसमोरच मुख्यमंत्र्यांचा कृतज्ञता समारंभ:पोलिस ठाण्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द
रविवार, ऑक्टोबर २६, २०२५
0
Tags
