कृष्णा साळुंके यांचे शिवतांडव; गायकवाड भगिनींचे शास्त्रीय गायन:तालचक्र युवा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पुणेकर रसिक मंत्रमुग्ध

फुले शाहू आंबेडकर
0
तालचक्र युवा महोत्सवाच्या दुसऱ्या आणि अंतिम दिवशी पखवाज वादक कृष्णा साळुंके यांनी सादर केलेले भारदस्त ‘शिवतांडव’ आणि ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ विजेत्या अंजली व नंदिनी गायकवाड भगिनींच्या शास्त्रीय गायनाने पुणेकर रसिक मंत्रमुग्ध झाले. विधी महाविद्यालय रस्त्यावरील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर येथील अॅम्फी थिएटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. तालवाद्यांचा देशातील महत्त्वाचा संगीत महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालचक्र महोत्सवाचे हे १३ वे वर्ष आहे. यावर्षी पुनीत बालन समूहाचे सहकार्य लाभले असून, महोत्सवाचे आयोजक व सुप्रसिद्ध तबलावादक पद्मश्री पं. विजय घाटे यावेळी उपस्थित होते. हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला होता. तालचक्र युवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात कृष्णा साळुंके यांच्या ‘शिवतांडव’ कार्यक्रमाने झाली. त्यांनी खंड जातीतील परण सादर करत कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर चौतालात विविध बंदिशी, तसेच ‘सोहम हर डमरू बाजे...’ आणि ‘ओम नम: शिवाय...’ या रचना त्यांनी प्रभावीपणे प्रस्तुत केल्या. त्यांना ज्ञानेश्वर अंडील व गोपाळ पांचाळ यांनी पखवाज, यशवंत थिट्टे यांनी संवादिनी, सुरंजन खंडाळकर यांनी गायन तर पृथ्वीराज कदम यांनी मंजिरा साथ केली. दुसऱ्या सत्रात अंजली व नंदिनी गायकवाड भगिनींनी शास्त्रीय गायन सादर करत उपस्थितांवर स्वर-मोहिनी घातली. राग यमनच्या बहारदार प्रस्तुतीने त्यांनी गायनाला सुरुवात केली. ‘आदी देव महादेव...’ ही तीन तालातील बंदिश आणि तराना त्यांनी गायला. यानंतर ‘सावळली धून विठ्ठल होऊन...’, ‘मन मंदिरा...’ या रचना सादर केल्या. निर्गुणी भजन, ‘धन्य धन्य भीमातीर...’ आणि ‘माझे आई रखुमाई...’ हे अभंग त्यांनी सादर केले. ‘धन्य भाग सेवा का अवसर पाया...’ या रचनेने त्यांनी समारोप केला. गायकवाड भगिनींना सोहम गोराणे यांनी तबला, ओंकार इंगवले यांनी पखवाज तर अंगद गायकवाड यांनी संवादिनीवर साथसंगत केली. महोत्सवाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default