शिरपूर (जि. धुळे) – तालुक्यातील थाळनेर परिसरात झालेल्या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची शासन स्तरावर दखल घेऊन तात्काळ पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी विकास सोसायटीचे चेअरमन रमेश मराठे यांनी शिरपूर तहसीलदारांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
नुकत्याच झालेल्या अनियमित आणि जोरदार पावसामुळे थाळनेर परिसरातील मका, सोयाबीन, कापूस, केळी, पपई या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने आर्थिक फटका बसला आहे. याशिवाय, ज्यांनी हरभरा पिकाची पेरणी केली होती त्या शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसला असून, पिकांवर ‘मर रोगाचा’ प्रादुर्भाव झाल्याने अनेक ठिकाणी पिके जमिनीतच बुरशीमुळे सडून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा खर्च करावा लागणार आहे.
या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी रमेश मराठे यांनी केली आहे. त्यांनी हे निवेदन जिल्हाधिकारी, कृषिमंत्री आणि स्थानिक आमदार यांनाही पाठवले आहे.
तहसील कार्यालयात हे निवेदन निवासी नायब तहसीलदार पंकजा मगर यांना देण्यात आले. यावेळी चेअरमन रमेश मराठे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य डोंगर कोळी, सामाजिक कार्यकर्ते गुणवंत पाटील, वामन शिंदे, निंबाकांत मराठे आणि मधुकर शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी सांगितले की, “पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे आम्हाला कर्ज फेडणे अवघड झाले आहे. सरकारने तातडीने मदत जाहीर करून पंचनामे करून दिलासा द्यावा,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
