जिकडे 'बॉम्बे' असेल, तिकडे आम्ही 'मुंबई' करू:उद्धव ठाकरेंचा मालवणी महोत्सवातून एल्गार, पक्ष-गाणे चोरले म्हणत शिंदेंना टोला

फुले शाहू आंबेडकर
0
"मुंबईत सध्या सोयीऐवजी गैरसोयीच वाढत आहेत. राज्यकर्ते अकलेचे तारे तोडत आहेत. पण आम्ही हे खपवून घेणार नाही. आम्हाला हिंदीचा द्वेष नाही, पण सक्ती मान्य नाही. त्यामुळे आता जिकडे जिकडे 'बॉम्बे' असेल, तिकडे आम्ही 'मुंबई' करू," असा एल्गार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. चारकोप येथील मालवणी महोत्सवात बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली. चारकोप विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी कांदिवली पश्चिम येथील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि त्यानंतर मालवणी महोत्सवाला हजेरी लावली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी मुंबईच्या सद्य-स्थितीवर बोट ठेवले. "मुंबईत ट्रॅफिकची समस्या भयंकर झाली असून हवेची गुणवत्ताही खालावत चालली आहे. मुंबईत नागरिकांसाठी सोयी कमी आणि गैरसोयीच जास्त वाढत आहेत," अशी टीका त्यांनी केली. जिथे बॉम्बे आहे तिथे तिथे मुंबई करु उद्धव ठाकरे म्हणाले, मराठी हळुवारपणे मारत चालले आहेत. आम्ही मराठी मारु देणार नाही. दिल्लीचे तक्त राखतो महाराष्ट्र माझा हे गाणे आहे. हिंदीची सक्ती करु नका. आम्हाला हिंदीचा द्वेष नाही, पण हिंदी सक्ती करू नका. त्यांचा एक मंत्री येऊन गेला सांगून गेला आयआयटी बॉम्बे आमच्याकडून राहून गेले. पण आम्ही सांगतोय जिथे जिथे बॉम्बे आहे तिथे तिथे मुंबई करु. याच्या विरुद्ध लढा द्यायचा आहे. हा आपला बालेकिल्ला आहे इथे भगवाच फडकणार. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना ठाकरे म्हणाले, "पंतप्रधान 'वन नेशन वन इलेक्शन'ची भाषा करतात, पण आम्ही सांगतो 'वन नाव, वन मत'. पक्ष चोरले आहे, तुम्ही गाणे गायले ते देखील चोरले आहे. पण हे तुमचे प्रेम आणि माया चोरु शकत नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांना लगावला." हिंदुत्वावरून भाजपला सुनावले भाजपच्या 'मुंबईचा महापौर हिंदू होणार' या नॅरेटिव्हचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले, " आज अमराठी आणि मुस्लीम बांधवही म्हणत आहेत की मुंबई शिवसेनेच्याच ताब्यात हवी आहे. विरोधक मुंबईवर मिठाचा खडा टाकत असतील, तर त्यांना बाजूला केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. काहीजण म्हणतात मुंबईचा महापौर हिंदू होणार. अरे, मग आम्ही जे मराठी महापौर बसवले होते, ते काय हिंदू नव्हते का? आम्ही हिंदूच आहोत, पण आम्ही महाराष्ट्राचा बळी जाऊ देणार नाही." नेमका 'बॉम्बे विरुद्ध मुंबई' वाद काय आहे? गेल्या काही दिवसांपासून राज्यात 'बॉम्बे' शब्दावरून राजकारण तापले आहे. त्याची सुरुवात केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या एका विधानाने झाली. मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना सिंह यांनी, "आयआयटी बॉम्बेचे नाव बदलून 'आयआयटी मुंबई' केले नाही, याचा मला आनंद आहे. बॉम्बे नावात एक वेगळीच भावना आहे," असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त करत, "हे विधान सरकारच्या मुंबईविषयीच्या पोटशूळाचे प्रतीक आहे," अशी टीका केली होती. त्यानंतर हा वाद चिघळला. भाजप नेते अमित साटम यांनी राज ठाकरेंच्या मुलांच्या शाळेच्या (बॉम्बे स्कॉटिश) नावावरून प्रतिसवाल केले. तर दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "आमच्यासाठी बॉम्बे नाही तर मुंबईच आहे," असे सांगत "आयआयटी बॉम्बेचे नाव बदलून आयआयटी मुंबई करण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिणार," अशी घोषणा केली. आता या वादात उद्धव ठाकरे यांनीही उडी घेतली असून, जिथे जिथे बॉम्बे नाव असेल, तिथे मुंबई करणार, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default