जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीचा अंतिम टप्पा जवळ येत असतानाच, राजकीय संघर्षाने धग धरण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जामखेडमध्ये प्रचारासाठी दाखल होताच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यासमोरच जोरदार निदर्शने करीत आक्रमक विरोध दर्शवला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून अनेक शिवसैनिकांना ताब्यात घेतले.
पोस्टर वॉरने राजकीय वातावरण तापले
फडणवीसांच्या आगमनाच्याच क्षणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी हातात खोचक फलक घेत संतप्त भूमिका मांडली. या पोस्टर्सवरून सत्ताधाऱ्यांना थेट जाब विचारण्यात आला—
जामखेडचे एमआयडीसी कोणामुळे थांबले?
जामखेडचा विकास निधी आणि धार्मिक स्थळांचा निधी का रोखला?
सीसीटीव्ही प्रकल्प रखडला तो कोणामुळे?
गुंडांना परदेशात कुणी पळवले?
या प्रश्नांनी संपूर्ण परिसराचे लक्ष त्या दिशेने खेचले. परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलीस यंत्रणेने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
आरोप-प्रत्यारोपांचा भडिमार
या घटनेत तालुकाप्रमुख मयुर डोके, विधानसभा प्रमुख गणेश उगले, नितीन ससाने, योगेश शिंदे, संदीप उगले, संयोग सोनवणे यांच्यासह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, ही संपूर्ण निवडणूक “विकास विरुद्ध गुन्हेगार” या मुद्द्यावर फिरत असल्याचे मत नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वी शहरात झळकलेल्या निनावी पत्रिकेमुळे आधीच राजकीय वातावरण तापले असताना, आता थेट गृहमंत्र्यांच्या दौर्यात या पोस्टर्सचे झळकणे म्हणजे संघर्ष अधिकच तीव्र झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रतिष्ठेची लढाई
जामखेडमधील ही निवडणूक भाजपचे नेते व विधान परिषद सभापती राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न ठरली आहे. दोन्ही बाजूंनी ताकद लावली असताना, आता प्रत्येक हालचालीवर राज्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
जामखेडमध्ये निवडणूक जशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय तापमान शिगेला पोहोचत आहे. प्रचार, पोस्टर वॉर आणि अटक–यांच्या मालिकेने जामखेडचे राजकारण पेटले आहे. पुढील काही दिवसांत या संघर्षाला आणखी कोणते वळण लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे…
