तिवसा | प्रतिनिधी
प्रशासकीय जबाबदाऱ्यांच्या चौकटीबाहेर पडत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी थेट वर्गात प्रवेश करत विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनुभव घेतला. तिवसा तालुक्यातील सालोरा (बुद्रुक) येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेला दिलेल्या भेटीत त्या काही काळासाठी शिक्षिकेच्या भूमिकेत दिसल्या आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.
वर्गात झालेल्या प्रश्नोत्तरांच्या सत्रात विद्यार्थ्यांनी दाखवलेला उत्स्फूर्त, आत्मविश्वासपूर्ण आणि अभ्यासपूर्ण प्रतिसाद पाहून सीईओ संजीता महापात्र अत्यंत आनंदी व प्रभावित झाल्या. विद्यार्थ्यांची समज, बोलण्यातील स्पष्टता आणि विचार मांडण्याची पद्धत पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
शाळेतील शिस्तबद्ध वातावरण, स्वच्छ व नीटनेटका परिसर, शिक्षकांचे नियोजनबद्ध अध्यापन, तसेच शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे सालोरा शाळेची गुणवत्ता अधोरेखित होत असल्याचे त्यांनी नमूद केले. विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये केवळ ज्ञानच नव्हे, तर कौशल्य, सर्जनशीलता आणि मूल्याधारित शिक्षणाची जोपासना होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उपक्रमांचे कौतुक करताना सीईओंनी शिक्षकवृंदाच्या मेहनतीची विशेष दखल घेतली. शिक्षकांचे विद्यार्थ्यांशी असलेले आपुलकीचे नाते आणि पालकांचा सकारात्मक सहभाग यामुळेच शाळा प्रगतीच्या शिखरावर पोहोचत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या भेटीदरम्यान सीईओ संजीता महापात्र यांनी विद्यार्थ्यांसोबत भोजनही केले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत त्यांनी पुस्तके व शालेय उपयोगी वस्तू भेट दिल्या. भविष्यातही अशाच नाविन्यपूर्ण आणि प्रेरणादायी उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवावा, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
या प्रसंगी तिवसा येथील गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे, सहायक गटविकास अधिकारी नारायण आमझरे, गटशिक्षणाधिकारी डॉ. नितीन उंडे, विस्तार अधिकारी राठोड व उलेमाल उपस्थित होते.
सालोरा बुद्रुक शाळेचा हा गौरव शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि पालकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत गटशिक्षणाधिकारी डॉ. नितीन उंडे यांनी व्यक्त केले.
