प्रेमाला रक्ताची किंमत!बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध करत भावानेच भर रस्त्यात प्रियकराचा खून; पुणे हादरले

फुले शाहू आंबेडकर
0
पुणे/प्रतिनिधी प्रेमसंबंधाला विरोध करत बहिणीच्या प्रियकराचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात घडली असून, या घटनेमुळे पुन्हा एकदा ‘ऑनर किलिंग’सारख्या अमानवी मानसिकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आंबेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील गायमुख चौक परिसरात सोमवारी (२२ डिसेंबर) सायंकाळी हा रक्तरंजित प्रकार घडला.
जावेद खाजामियां पठाण (वय ३४, सध्या रा. नऱ्हेगाव, पुणे; मूळ रा. भोकर, जि. नांदेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी प्रेयसीचा भाऊ संदीप रंगराव भुरके (वय २५, रा. भोकर, जि. नांदेड) याच्यासह त्याच्या एका साथीदाराविरोधात आंबेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत जावेदचा मित्र रौफ उस्मान शेख यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
शेजारी राहणाऱ्यांची ओळख, त्यातून प्रेम… आणि अखेर रक्तपात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेद पठाण आणि संबंधित तरुणी हे दोघेही नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील रहिवासी होते. एकाच परिसरात, शेजारी राहिल्याने दोघांची अनेक वर्षांची ओळख होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. मात्र, हे नाते तरुणीच्या भावाला मान्य नव्हते. जात-धर्म आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या नावाखाली संदीप भुरकेच्या मनात या प्रेमाविरोधात तीव्र चीड होती.
११ डिसेंबर रोजी जावेद आणि तरुणी घरातून निघून पुण्यात आले. नऱ्हे परिसरात ते एकत्र राहू लागले. बहिण मुस्लिम प्रियकरासोबत पळून गेल्याचा राग संदीपच्या मनात सतत खदखदत होता. अखेर बहिण पुण्यात असल्याची माहिती मिळताच संदीप एका साथीदारासह पुण्यात दाखल झाला.
वाद, हाणामारी आणि धारदार शस्त्राचे वार
सोमवारी सायंकाळी संदीप थेट जावेद राहत असलेल्या परिसरात पोहोचला. तेथे त्याने जावेदशी जोरदार वाद घातला. काही क्षणांतच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापाच्या भरात संदीपने धारदार शस्त्र काढून जावेदवर सपासप वार केले. डोक्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर गंभीर जखमा झाल्याने जावेद जागीच कोसळला.
घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. नागरिकांनी तत्काळ जावेदला रुग्णालयात दाखल केले. मात्र, ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. दरम्यान, हल्ल्यानंतर संदीप भुरके आणि त्याचा साथीदार घटनास्थळावरून फरार झाले.
आरोपी फरार, पोलिसांचा कसून शोध
घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून, लवकरच आरोपींना अटक केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी दिली.
ऑनर किलिंगच्या मानसिकतेवर पुन्हा प्रश्न
प्रेम केल्याची शिक्षा मृत्यू असू शकते का? सामाजिक प्रतिष्ठेच्या नावाखाली जीव घेण्याचा अधिकार कुणाला आहे? अशा प्रश्नांनी या घटनेनंतर पुन्हा डोके वर काढले आहे. प्रेमसंबंधाला विरोधातून झालेल्या या निर्घृण हत्येने पुणे शहर हादरले असून, कायदा-सुव्यवस्थेसह समाजमनालाही गंभीर विचार करायला लावणारी ही घटना ठरली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default