राज्यात सर्वत्र निवडणुकांचे पडसाद उमटत असतानाच नाशिक जिल्ह्यातील सटाण्यात एक खळबळजनक गुन्हेगारी प्रकरण उघडकीस आले आहे. देवमामलेदार यात्रोत्सवाच्या गर्दीचा गैरफायदा घेत पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीवर सटाणा पोलिसांनी जोरदार कारवाई करत उच्चशिक्षित डॉक्टरसह सहा जणांना अटक केली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण बागलाण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांना खबऱ्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शुक्रवारी (दि. 19 डिसेंबर) रात्री एमएच 41 बीई 4645 क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून बनावट नोटा सटाण्यात आणल्या जात असल्याची माहिती मिळाली होती. यात्रास्थळी कडक बंदोबस्त असतानाच पोलिसांनी सापळा रचत सटाणा–ताहाराबाद मार्गावरील एका पेट्रोलपंपावर कारवाई केली. पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने बनावट नोटा देण्याचा प्रयत्न सुरू असतानाच पोलिसांनी टोळीला रंगेहाथ पकडले.
या कारवाईत पाचशे रुपयांच्या बनावट नोटा – एकूण 15 हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. तपासादरम्यान या टोळीत उच्चशिक्षित डॉक्टरचा समावेश असल्याचे समोर आल्याने प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये हर्षल नंदन, अनिकेत नवरे, जयेश पवार, गौरव पवार, शुभम गवळी, प्रफुल गवळी व श्याम गवळी यांचा समावेश असून सर्व आरोपी बागलाण तालुक्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी या टोळीकडून चार महागडे मोबाईल, चारचाकी वाहन असा सुमारे 4 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शनिवारी सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 24 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणामागे केवळ स्थानिक टोळी नसून मोठे बनावट नोटांचे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्राथमिक तपासात या गुन्ह्याचे धागेदोरे संभाजीनगर आणि नागपूरपर्यंत पोहोचत असल्याची माहिती मिळत असून, बनावट नोटा छापल्या जाणाऱ्या ठिकाणाचा शोध घेण्यासाठी विशेष पथक काम करत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर यात्रोत्सवातील व्यापारी, दुकानदार आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेकांनी 500 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास नकार देण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, व्यवहार करताना नोटांची बारकाईने तपासणी करावी आणि कोणतीही संशयास्पद नोट आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे.
नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोखीने व्यवहार झाल्याने, त्या व्यवहारांवरही आता संशयाची सुई फिरू लागली आहे. सटाणा पोलिसांच्या या कारवाईमुळे बनावट नोटांच्या काळ्या धंद्याचा मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, येत्या काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
