भरधाव स्विफ्टचा मृत्यूघात! कादवा पुलावर शिक्षिकेचा जागीच अंत; पिंपळगाव पोलिसांत गुन्हा दाखल

फुले शाहू आंबेडकर
0
पिंपळगाव बसवंत/ प्रतिनिधी
मुंबई–आग्रा महामार्गावर मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरून गेला. ओझर येथून पिंपळगाव बसवंतकडे शाळेत अध्यापनासाठी निघालेल्या एका शिक्षिकेच्या स्कूटीला भरधाव स्विफ्ट कारने पाठीमागून जोराची धडक दिल्याने शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे शिक्षण क्षेत्रासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत शिक्षिकेचे नाव मनीषा देविदास निरभवणे (वय ३८, रा. दत्तनगर, ओझर) असे असून त्या पिंपळगाव बसवंत येथील आदर्श इंग्लिश स्कूल मध्ये अध्यापन करत होत्या. नेहमीप्रमाणे त्या मंगळवारी सकाळी आपल्या ओला कंपनीच्या स्कूटीने (एम.एच. १५ के.डी. २०६९) शाळेकडे निघाल्या होत्या.
सकाळच्या सुमारास मुंबई–आग्रा महामार्गावरील टोल नाक्याच्या मागे असलेल्या कादवा नदी पुलावर भरधाव वेगात आलेल्या स्विफ्ट कारने (एम.एच. १५ जी.आर. १६३१) त्यांच्या स्कूटीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की मनीषा निरभवणे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर काही काळ महामार्गावर एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात आली.
या प्रकरणी मयत शिक्षिकेचे दीर रवींद्र सुदाम निरभवणे यांच्या फिर्यादीवरून स्विफ्ट कार चालक आकाश शेवाळे याच्याविरोधात पिंपळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अपघाताची सखोल चौकशी सुरू असून भरधाव वेग व निष्काळजी वाहनचालना कारणीभूत ठरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, एका कर्तव्यदक्ष शिक्षिकेचा अशा प्रकारे झालेला दुर्दैवी अंत पाहून सहकारी शिक्षक, विद्यार्थी व नागरिकांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. महामार्गावरील भरधाव वाहनांमुळे वाढणाऱ्या अपघातांवर कठोर कारवाईची मागणीही यानिमित्ताने पुन्हा ऐरणीवर आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default