पतीसाठी अटक वॉरंट दाताने फाडले; पत्नीचा थरार म्हसरुळ पोलीस ठाण्यात एकच गोंधळ

फुले शाहू आंबेडकर
0
नाशिक/ म्हसरुळ
न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करताना म्हसरुळ पोलिसांना एका थरारक घटनेला सामोरे जावे लागले. सन २०१९ मधील जबरी चोरी व मारहाणीच्या गुन्ह्यात संशयित पतीस अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर संशयिताची पत्नीच आक्रमक झाली. “पतीला अटक करू नका” असा आक्रोश करत तिने थेट पोलिसांशी झटापट केली, अटक वॉरंट व न्यायालयीन कागदपत्रे दाताने चावून फाडली, इतकेच नव्हे तर कडेवरील चिमुकल्याचे डोके जमिनीवर आपटण्याचा प्रयत्न करत एकच राडा घातला. शुक्रवारी (दि. १२) दुपारी घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ म्हसरुळ पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
राकेशकुमार रामराज बिंद उर्फ निशाद (वय ३५) व बिंदूदेवी राकेशकुमार बिंद (वय ३०, दोघे रा. विठाईनगर, पवारमळा, पेठरोड) अशी संशयित दाम्पत्याची नावे आहेत. या प्रकरणी दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा, चिथावणी व अन्य कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्रथम वर्ग न्यायालयाच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी राकेशकुमारविरोधात अटक वॉरंट जारी केल्यानंतर म्हसरुळ पोलीस ठाण्यातील अंमलदार सोमनाथ गुंबाडे व सहकाऱ्यांनी संशयिताच्या घरी धडक दिली. त्यावेळी पत्नी बिंदूदेवी हिने जोरदार विरोध करत पोलिसांशी हुज्जत घातली. नातेवाईकांनी समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र परिस्थिती अधिकच बिघडली. अखेर ‘सीआर’ मोबाईलवरील हवालदार वसावे, जाधव तसेच महिला अंमलदार सोनवणे यांच्या मदतीने संशयितास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
पोलीस ठाण्यात पोहोचताच बिंदूदेवीने आरडाओरड सुरू केली. “न्यायालयात कार्यवाही करा, तेथे कायदेशीर सुटका करून घ्या,” असे सांगूनही ती आक्रमकच राहिली. टेबलावर हात आपटत ढकलाढकली करण्याचा प्रयत्न झाला. याचवेळी राकेशकुमारने पत्नीला चिथावणी देत कडेवरील लहान मुलाला जमिनीवर आपटण्यास सांगितले. परिस्थिती गंभीर होताच महिला अंमलदार भुसारेंसह आवारे, थोरात, राकेश शिंदे, स्वप्निल गांगुर्डे व हवालदार सोनवणे धावून आले. त्यांनी तात्काळ हस्तक्षेप करत चिमुकल्याची सुटका केली.
वॉरंट फाडून फेकले राकेशकुमारला न्यायालयात नेण्याच्या तयारीत असताना बिंदूदेवीने त्याला घट्ट धरून ठेवले. झटापटीत तिने टेबलावर ठेवलेले न्यायालयाचे एनबी वॉरंट, आरोपी अटक फॉर्म, अटकेची माहिती, आधारकार्डच्या प्रती व न्यायालयाचे कव्हरिंग लेटर हातात घेऊन दाताने चावून फाडून टाकले. संपूर्ण प्रकाराने पोलीसही क्षणभर मेटाकुटीस आले.
दरम्यान, राकेशकुमारने पत्नीला “पोलीस मारहाण करतात असे कोर्टात सांग” अशी चिथावणी दिल्याचेही समोर आले. अखेर पोलिसांनी सर्व परिस्थितीची माहिती न्यायालयास दिली. न्यायालयाने राकेशकुमारला १७ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या घटनेतील दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default