10 तोळे सोनं, 20 लाख रोख देऊनही पुण्यातील प्रतिष्ठित कुटुंबाची हुंडेखोरी उघडी निवृत्त पोलिस निरीक्षकाच्या मुलीची फसवणूक; 5 जणांवर गुन्हा दाखल

फुले शाहू आंबेडकर
0
छत्रपती संभाजीनगर :हुंडा देणं गुन्हा आहे, हे माहिती असूनही समाजात आजही उघडपणे हुंडेखोरी सुरूच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 10 तोळे सोनं, 20 लाख रुपये रोख, पंचतारांकित हॉटेलमधील खर्च असा तब्बल 50 लाख 48 हजार रुपयांचा खर्च उकळून अखेर लग्नास नकार दिल्याचा गंभीर आरोप पुण्यातील एका प्रतिष्ठित कुटुंबावर करण्यात आला आहे. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात खळबळ उडाली आहे.
पीडित तक्रारदार हे निवृत्त पोलिस निरीक्षक असून त्यांच्या मुलीसाठी पुण्यातील जगदीश लिहितकर (निवृत्त मुख्य अभियंता) यांच्या मुलाचे स्थळ आले होते. सुरुवातीला लिहितकर कुटुंबाने आपली आर्थिक, सामाजिक प्रतिष्ठा मोठ्या थाटात मांडत मुलीच्या कुटुंबाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर 12 मे 2025 रोजी शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थाटामाटात साखरपुडा पार पडला.
 साखरपुड्यानंतर सुरू झाली पैशांची भूक
साखरपुडा झाल्यानंतर वरपक्षाकडून मागण्यांचा अक्षरशः पाऊस पडू लागला.
महागडी ‘सॉलिटेअर डायमंड व्हाइट गोल्ड’ अंगठी,
10 तोळे सोन्याचे दागिने,
घरबांधकामाच्या नावाखाली 20 लाख रुपये रोख,
तसेच साखरपुड्यासाठी पंचतारांकित हॉटेलचा सुमारे 10 लाख रुपयांचा खर्च मुलीच्या वडिलांकडून वसूल करण्यात आल्याचा आरोप आहे.
 लग्न जवळ येताच नवे फतवे
लग्नाची तारीख ठरून पत्रिका वाटून झाल्यानंतर वरपक्षाने पुन्हा 15 तोळे सोनं आणि इतर अवाजवी मागण्या केल्या. या मागण्या पूर्ण न झाल्यास लग्न करणार नसल्याची थेट ध संघमकी देण्यात आली. अखेर, कोणतीही चर्चा न करता व्हॉट्सअॅपवर संदेश पाठवून लग्न स्थगित केल्याची माहिती देण्यात आली, त्यामुळे मुलीच्या कुटुंबावर मानसिक आघात झाला.
महिला आयोगातही तोडगा नाही
मुलीच्या भवितव्याचा विचार करून पीडित कुटुंबाने राज्य महिला आयोगाकडे मध्यस्थीसाठी धाव घेतली. मात्र आयोगासमोर झालेल्या बैठकीतही वरपक्षाने क्षुल्लक कारणे पुढे करत लग्नास साफ नकार दिला. आपली योजनाबद्ध फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच अखेर पोलिसांकडे धाव घेण्यात आली.
 वरिष्ठ अधिकारी असल्याचा दबाव?
या प्रकरणात जगदीश लिहितकर, त्यांची पत्नी, मुलगा आणि जावई ऋषिकेश यशोद यांच्यासह एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कुटुंबातील जावई हा एका विभागातील वरिष्ठ अधिकारी असून, त्याने आपल्या पदाचा गैरवापर करून दबाव टाकल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
सध्या या प्रकरणाचा छावणी पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून, हुंडेखोरी आणि आर्थिक फसवणुकीच्या या घटनेने समाजातील मुखवट्याआडची मानसिकता पुन्हा एकदा उघडी पाडली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default