पाचव्या मजल्यावरून मृत्यू की घातपात? नाशिक हादरलं; शिक्षिकेच्या मृत्यूनं अनेक प्रश्न, नातेवाईकांचा संशय गडद

फुले शाहू आंबेडकर
0
नाशिक/प्रतिनिधी
नाशिक शहरात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. इंदिरानगर परिसरातील गोदावरी अपार्टमेंटमध्ये एका 40 वर्षीय महिला शिक्षिकेचा पाचव्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र हा अपघात होता की आत्महत्या, की यामागे काही वेगळंच गूढ दडलं आहे, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी 31 डिसेंबर रोजी दुपारी सुमारे तीन वाजेच्या सुमारास स्वाती दीपक पवार (वय 40, रा. गोदावरी अपार्टमेंट, कमोदनगर, इंदिरानगर, नाशिक) या पाचव्या मजल्यावरून खाली पडल्या. या घटनेत त्यांना गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. घटनेनंतर पती दीपक पवार यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्या अपार्टमेंटमधून कशा पडल्या, पाय घसरला की उडी मारली, की त्यांना ढकलण्यात आले, याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, मृत शिक्षिकेच्या नातेवाईकांनी घटनेबाबत संशय व्यक्त केला असून सखोल तपासाची मागणी केली आहे. शिक्षिकेचा कौटुंबिक व सामाजिक जीवन सामान्य होते, कोणताही तणाव दिसून येत नव्हता, असा दावा नातेवाईकांकडून केला जात आहे. त्यामुळे हा मृत्यू अपघाती नसून त्यामागे काही वेगळे कारण असू शकते, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
विशेष म्हणजे, याच दरम्यान नाशिक जिल्ह्यात मंगळवारी 30 डिसेंबर रोजी पास्ते घाट परिसरात रस्त्याच्या कडेला रक्तबंबाळ अवस्थेत एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. प्राथमिक तपासात धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे आणि गळा आवळल्याचे स्पष्ट झाले होते. या घटनेनेही जिल्ह्यात खळबळ उडवली असून गुन्हेगारी घटनांच्या मालिकेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
इंदिरानगर येथील शिक्षिकेच्या मृत्यू प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश साळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची चौकशी तसेच मृतदेहाचे शवविच्छेदन अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.
हा मृत्यू अपघात की आत्महत्या, की घातपात—याचं सत्य उघड होण्यासाठी नाशिककरांची नजर आता पोलिसांच्या तपासाकडे लागली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default