आईवरचा अत्याचार थांबवण्यासाठी मुलाचा संताप अनावर; बापालाच ठार मारून मृतदेह दरीत फेकला

फुले शाहू आंबेडकर
0
धडगाव तालुक्यातील खेडीबारपाड्यात थरकाप उडवणारी घटना, दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
धडगाव / प्रतिनिधी
दारूच्या नशेत पत्नीला रोज मारहाण करणाऱ्या वडिलांचा अखेर मुलाच्याच हातून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना धडगाव तालुक्यातील वेलखेडीच्या खेडीबारपाडा येथे उघडकीस आली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. आईवर होणारा अन्याय सहन न झाल्याने मुलाने काकाच्या मदतीने वडिलांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह खोल दरीत फेकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मृत व्यक्तीचे नाव किसन वेस्ता वळवी (वय ३५) असे असून, तो नेहमी दारू पिऊन पत्नीला शिवीगाळ व मारहाण करत असल्याचे समोर आले आहे. पत्नीवर होणाऱ्या अत्याचारामुळे मुलगा दिनेश किसन वळवी आणि शेजारी राहणारा भाऊ सायसिंग वेस्ता वळवी हे दोघेही त्रस्त झाले होते. अनेकदा त्यांनी किसन वळवी यांना समज देण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही.
घटनेच्या रात्रीही किसन वळवी दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करत होता. हा प्रकार पाहून संतप्त झालेल्या दिनेशने काका सायसिंग यांच्या मदतीने वडिलांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यानंतर लाकडी दांडक्याने डोक्यात जोरदार वार करण्यात आला. या गंभीर मारहाणीत किसन वळवी यांचा जागीच मृत्यू झाला.
वडिलांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच ही बाब बाहेर उघड होऊ नये म्हणून दोघांनी मृतदेह गावाजवळील पिंपळबार टेकडी परिसरात नेऊन खोल दरीत फेकून दिला. काही वेळाने हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मृताचा मोठा भाऊ खेत्या वेस्ता वळवी यांनी म्हसावद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीवरून म्हसावद पोलिसांनी सायसिंग वेस्ता वळवी आणि दिनेश किसन वळवी (रा. वेलखेडीचा खेडीबारपाडा, ता. धडगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन कामे करत आहेत.
आईवरील अत्याचारातून उफाळून आलेला मुलाचा संताप, त्यातून घडलेली हत्या आणि नंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न 
 या संपूर्ण घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default