महापालिका निवडणुका संपताच गुंडगिरी पुन्हा उफाळून आली असल्याचे चित्र असून, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलग दुसऱ्या दिवशी शस्त्रधारी टोळक्याने दहशत माजवली. बुधवारी रात्री खुटवडनगर परिसरात १५ ते २० युवकांचे टोळके नशेत धुंद अवस्थेत चारचाकी वाहनातून परिसरात फिरत होते. याच दरम्यान श्रीपाद निवासी संकुलाच्या प्रवेशद्वाराला त्या वाहनाने जोरदार धडक दिली. अपघातात दोघे जखमी झाले.
अपघातानंतर स्थानिक रहिवाशांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. मात्र चालकाने गाडी काढत घटनास्थळावरून पळ काढला. वाहनातील युवक नशेत असल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी ११२ या क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. पोलिस येण्यापूर्वीच टोळक्याने तलवार, दांडे आणि कोयते हातात घेत इमारतीच्या परिसरात दहशतीचा नंगानाच सुरू केला.
याच वेळी किशोर मटाले या युवकावर टोळक्याने कोयत्याने सपासप वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत मटाले जमिनीवर कोसळताच हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पोबारा केला. परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी यांनी स्वतः घटनास्थळी तसेच अंबड पोलीस ठाण्याला भेट देत तपासाला गती देण्याच्या सूचना दिल्या. रात्री उशिरापर्यंत संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकाराची माहिती समजताच नगरसेविका सुवर्णा मटाले, साधना मटाले तसेच माजी नगरसेवक तानाजी जायभावे यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेत हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली. मात्र हल्ल्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, विविध गुन्ह्यांत गुंतलेल्या संशयितांची कसून चौकशी सुरू असल्याचे सहायक पोलीस आयुक्तांनी सांगितले.
अंबड परिसरात गुन्हेगारीचा कहर
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत औद्योगिक वसाहत आणि कामगारबहुल वस्ती असल्याने किरकोळ कारणांवरून वाद होण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र गेल्या तीन दिवसांत घडलेल्या घटनांनी गुन्हेगारीचे स्वरूप अधिकच भयानक बनले आहे. त्रिमूर्ती चौक परिसरात २० जणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड करत धुडगूस घातला होता. त्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे उघड झाले असून सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कोयता हल्ला, वाहनांची नासधूस आणि शस्त्रधारी टोळक्यांचा उन्माद यामुळे सिडको–अंबड परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. “पोलिसांचा धाक कमी पडतोय का?” असा सवाल आता उघडपणे विचारला जात असून, शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
