मालेगावहून धुळे शहराकडे मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मोहाडी उपनगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक शिल्पा पाटील यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती तात्काळ पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या निदर्शनास आणून दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी धुळे शहरालगत असलेल्या लळींग टोलनाक्याजवळ सापळा रचला.
लळींग टोलनाक्यापुढे धुळ्याकडे येणाऱ्या रस्त्यावर ‘जय मल्हार’ चहाच्या टपरीजवळ ट्रक क्रमांक एमएच 23 एयू 7042 संशयास्पदरीत्या उभा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी तात्काळ ट्रकचालकाची चौकशी सुरू केली. चालकाने आपले नाव मुकेश नाथु प्रजापती (रा. धानी कचावदा, ता. धरमपुरी, जि. मध्यप्रदेश) असे सांगितले. मात्र ट्रकमधील मालाबाबत विचारणा केल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला.
संशय बळावल्याने ट्रक पोलीस ठाण्यात आणून सखोल झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान ट्रकमध्ये तब्बल 1500 बॉक्स अवैध दारू आढळून आली. या दारूसाठ्याची किंमत सुमारे 92 लाख 16 हजार रुपये इतकी असून, चालकाकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसल्याने ही दारू बेकायदेशीररीत्या वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी ट्रकसह एकूण एक कोटी दोन लाख 16 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, चालकाविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या तस्करीमागील मुख्य सूत्रधार कोण आहे, दारू कुठून आणली जात होती आणि नेमकी कुठे पोहोचवली जाणार होती, याचा तपास मोहाडी पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे.
या धडक कारवाईमुळे महामार्गावरील अवैध दारू तस्करीचा मोठा पर्दाफाश झाला असून, लवकरच या रॅकेटमधील मोठे मासे गजाआड होणार असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.
