पीडित महिला घर खरेदीच्या व्यवहारासाठी १३ लाख रुपयांची रोकड घेऊन वडाळा परिसरात आली होती. याच संधीचा फायदा घेत तिघांनी स्वतःला पोलिस असल्याचे भासवत महिलेला अडवले. तपासाच्या नावाखाली चौकशी करत त्यांनी महिलेला घाबरवले आणि क्षणात रोकड लंपास करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
घटनेनंतर महिलेकडून मिळालेल्या तक्रारीच्या आधारे देवनार पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपी गोवंडी परिसरात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून तिघांनाही अटक करण्यात आली.
पोलिसांच्या झडतीत आरोपींकडून लुटलेली संपूर्ण १३ लाख रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत आरोपी हे सराईत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून त्यांनी यापूर्वीही अशाच पद्धतीने फसवणूक केल्याचा संशय आहे.
सध्या आरोपींविरोधात फसवणूक, तोतया पोलिस बनून गुन्हा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी अनोळखी व्यक्ती पोलिस असल्याचा दावा करत असल्यास ओळखपत्राची खात्री करूनच सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
ही घटना शहरात वाढत चाललेल्या तोतया पोलिसांच्या प्रकारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली असून नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
