“युवकांनो, तंत्रज्ञान शत्रू नाही; मात्र त्याचा अतिरेक केल्यास तो घातक ठरतो. गरज, विवेक आणि मूल्यांची कास धरूनच तंत्रज्ञानाचा वापर करा,” असा ठाम आणि विचारप्रवर्तक संदेश ज्येष्ठ विचारवंत प्रा. प्रकाश पाठक (धुळे) यांनी शिरपूर येथे दिला.
किसान विद्या प्रसारक संस्थेचे एस. पी. डी. एम. महाविद्यालय, शिरपूर आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटराव रणधीर व्याख्यानमालेत ते ‘सोशल मीडिया : चिंता व चिंतन’ या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील कर्मवीर दालनात करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून श्रीमती आशाताई रंधे (खजिनदार, किसान विद्या प्रसारक संस्था) उपस्थित होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे विश्वस्त मा. प्राचार्य डॉ. एस. एन. पटेल आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. राजपूत व्यासपीठावर होते.
प्रा. पाठक यांनी आपल्या व्याख्यानाची सुरुवात स्वर्गीय कर्मवीर अण्णासाहेब रणधीर यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याच्या स्मरणाने केली. ते म्हणाले,
“कोविड काळात तंत्रज्ञानाने मानवजातीला मोठा आधार दिला. तंत्रज्ञान वाईट नसते, मात्र त्याचा वापर आपण कोणत्या हेतूने करतो यावर सर्व अवलंबून असते. गुगल माहिती देतो, पण माहितीचे ज्ञानात रूपांतर करू शकत नाही.”
पुढे ते म्हणाले,
“यंत्र माणसाला सवयी लावते आणि सवयींमुळे माणूस गुलाम होतो. सुखाच्या मागे धावण्याची सवय घातक आहे, आणि तंत्रज्ञान आपल्याला याच सुखाच्या मागे धावायला लावते. आज अनेक कष्टाची कामे यंत्रांनी घेतली आहेत, मात्र सोशल मीडियामुळे भ्रम, अफवा आणि प्रसिद्धीची हाव वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे.”
“घटना खरी की खोटी याची शहानिशा न करता समाजमाध्यमांवर माहिती पसरवली जाते. त्यामुळे या माध्यमांचा वापर केवळ माहिती, शिक्षण आणि जगाची दिशा समजून घेण्यासाठीच करावा,” असा सल्लाही त्यांनी दिला.
“आज ए.आय. (Artificial Intelligence) ही संकल्पना आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगात शिरली आहे. गुगलवर असंख्य दर्जेदार पुस्तके उपलब्ध असतानाही तरुण पिढी आपला बहुमूल्य वेळ रील्स आणि केवळ मनोरंजनात घालवत आहे. १५ ते २५ वयोगटातील तरुणांचा मोबाईल वापर सरासरी आठ तासांपर्यंत पोहोचला आहे, हे अत्यंत गंभीर वास्तव आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावीपणे पार पडले असून आभार प्रदर्शन प्रा. प्रशांत पाटील यांनी केले.

