धुळे/प्रतिनिधी
धुळे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आज धुळ्यात घेतलेल्या प्रचारसभेत भाजप आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. “तुमचा सत्तेतला बाप जरी आला तरी एमआयएमचे उमेदवार मागे हटणार नाहीत”, असे खळबळजनक विधान करत ओवैसी यांनी राजकीय वातावरण तापवले.
धुळ्यात एमआयएमच्या उमेदवारांवर दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप करत ओवैसी म्हणाले की, “एमआयएमचे उमेदवार माघार घ्यावेत यासाठी थेट फोन केले जात आहेत. मात्र कुणीही गैरसमज करून घेऊ नये, दबावाला भीक घालणारा हा पक्ष नाही.”
काँग्रेसने बनवलेले कायदे मोदी सरकारला मदत करतायत!
आपल्या भाषणात ओवैसी यांनी काँग्रेसवरही तितक्याच आक्रमक शब्दांत टीका केली.
“साडेपाच वर्षांपासून दोन तरुण तुरुंगात आहेत. हा कायदा कोणी बनवला? काँग्रेसने! स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचा कोणता नेता दोन ते पाच वर्ष तुरुंगात गेला? डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारने हे कायदे केले आणि आज त्याच कायद्यांचा वापर मोदी सरकार करत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 2019 मध्ये हे कायदे अधिक कडक केल्याचे सांगत, “आम्ही संसदेत या कायद्याच्या विरोधात मतदान केलं,” असेही ओवैसी म्हणाले.
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणाचा दाखला; काँग्रेसवर गंभीर आरोप
मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणाचा उल्लेख करत ओवैसी म्हणाले,
“या प्रकरणात 11 मुसलमानांना पकडलं गेलं. तब्बल 19 वर्ष ते तुरुंगात होते. नंतर हायकोर्टाने सांगितलं की ते निर्दोष आहेत. तेव्हा देशात कोणाची सत्ता होती? काँग्रेसची! मग या अन्यायाला जबाबदार कोण?”
‘मुसलमान दिसला की बांगलादेशी?’
1962 मधील जम्मू-काश्मीर दंगलींचा संदर्भ देत ओवैसी म्हणाले की,
“त्या काळात पीडितांना बांगलादेशात ढकललं गेलं. आजही मुसलमान दिसला की त्याला बांगलादेशी म्हटलं जातं. मोदी सरकारसुद्धा आज काँग्रेसच्या जुन्याच पॉलिसीवर काम करत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
वक्फ बोर्डावर कारवाईचा मुद्दा तापवला
वक्फ बोर्डाच्या जमिनींवरील कारवाईवर बोलताना ओवैसी म्हणाले,
“हिंदू देवस्थान समितीत बाहेरचा प्रतिनिधी चालत नाही. मात्र वक्फ बोर्डात नॉन-मुस्लिम सदस्य बसवण्याचा कायदा केला गेला. हा दुजाभाव नाही का? याच कायद्यांच्या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुका होत आहेत.”
“15 तारखेला MIM च्या बटनवरच मत द्या”
मतदारांना थेट आवाहन करत ओवैसी म्हणाले,
“या अन्यायाच्या विरोधात उभं राहायचं असेल तर धुळे महापालिकेत एमआयएमचे उमेदवार निवडून द्या. 15 तारखेला एमआयएमच्या बटनवर मत दाबा. भाजपवाले म्हणतात मकरसंक्रांतीला MIM च्या पतंगावर बंदी घाला, पण 16 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात MIM ची पतंग उडताना दिसेल, असा दावा त्यांनी केला.
ओवैसींच्या या आक्रमक भाषणामुळे धुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, महापालिका निवडणुकीच्या प्रचारात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
