छत्रपती संभाजीनगर हादरले! ‘रक्षक’च ठरला भक्षक; 58 वर्षीय PSI कडून 23 वर्षीय तरुणीवर अत्याचार, तीन वेळा गर्भपाताचा आरोप

फुले शाहू आंबेडकर
0
छत्रपती संभाजीनगर : कायद्याचा रक्षकच जेव्हा विश्वासघात करतो, तेव्हा समाजातील सुरक्षिततेची भावना डळमळते. अशीच संतापजनक घटना छत्रपती संभाजीनगर शहरात उघडकीस आली आहे. मोबाईल हरवल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या 23 वर्षीय तरुणीवर 58 वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाने अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मदतीचा बहाणा, प्रेमाचे आमिष आणि लग्नाची खोटी आश्वासने देत तब्बल वर्षभर तिचे शारीरिक व मानसिक शोषण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
या प्रकरणी संबंधित अधिकारी, त्याची पत्नी आणि मुलगा यांच्याविरोधात क्रांती चौक पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अन्य मारहाणीच्या घटनेची नोंद बेगमपुरा पोलीस ठाणे येथे आहे. घटना 7 मार्च 2025 ते 18 फेब्रुवारी 2026 या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
मोबाईल तक्रारीतून ‘प्रेमजाळे’पर्यंत...
पीडिता मूळची नांदेडची असून पुण्यात खासगी नोकरी करते. 7 मार्च 2025 रोजी ती मोबाईल हरवल्याची तक्रार देण्यासाठी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गेली होती. त्यावेळी तिची ओळख पोलीस उपनिरीक्षक सुभाष चव्हाण याच्याशी झाली.
तक्रारीच्या निमित्ताने आरोपीने तिचा संपर्क क्रमांक घेतला आणि “नंबर कन्फर्म करण्यासाठी फोन केला” अशी थाप मारत संवाद सुरू ठेवला. हळूहळू सततच्या फोन कॉल्स आणि भेटींमधून विश्वास संपादन करण्यात आला. लग्नाचे आश्वासन देत आरोपीने शहरातील विविध लॉजवर नेऊन तिच्याशी संबंध ठेवल्याचा आरोप आहे.
बनावट मंगळसूत्र, खोटे वैवाहिक नाटक
तक्रारीनुसार, आरोपीने तरुणीच्या गळ्यात बनावट मंगळसूत्र बांधून तिला पत्नी असल्याचा भास निर्माण केला. लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. या काळात ती गर्भवती राहिल्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध पुणे आणि संभाजीनगर येथे तीन वेळा गर्भपात घडवून आणल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
लग्नाची मागणी केली आणि सुरू झाला छळ
तरुणीने विवाहासाठी तगादा लावताच आरोपीचे खरे रूप समोर आले. तक्रारीनुसार, त्याने जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. एवढेच नव्हे तर आरोपीची पत्नी नर्मदा चव्हाण आणि मुलगा सागर चव्हाण यांनीही पीडितेला धमकावून मारहाण केल्याचा आरोप आहे.
28 जानेवारी रोजी आरोपीच्या पत्नीने “नवऱ्याचा पाठलाग करू नको, गर्भपात कर” असे म्हणत मारहाण केल्याचे नमूद आहे. आरोपीच्या मुलाकडून झालेल्या मारहाणीमुळे दीड महिन्याचा गर्भपात झाल्याचा धक्कादायक दावा तक्रारीत आहे.
मानसिक छळाला कंटाळून अखेर पोलिसांत धाव
सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून तरुणीने अखेर पोलिसांत धाव घेतली. संबंधित अधिकाऱ्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल झाले असून पोलीस यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.
या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default