नगरपालिकेचे बनावट शिक्के, अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या; ७ वर्षांपासून सुरु होता बोगस दाखल्यांचा गोरखधंदा — नंदुरबारमध्ये सायबर कॅफेचं काळं कारस्थान उघड

फुले शाहू आंबेडकर
0
नंदुरबार / प्रतिनिधी: डिजिटल युगात गुन्हेगारीही हायटेक होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. नंदुरबार शहरात तब्बल सात वर्षांपासून सुरु असलेल्या बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून, या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे. शास्त्री मार्केट परिसरातील एका सायबर कॅफेमधून हा बोगस दाखल्यांचा उद्योग सुरु असल्याचे उघडकीस आले आहे.
नंदुरबार शहरातील आ. के. ऑनलाइन सायबर कॅफे येथून बनावट नगरपालिकेचे शिक्के, अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या वापरून जन्म व मृत्यू प्रमाणपत्रे तयार केली जात होती. या प्रकरणी पोलिसांनी अनिल यशवंत कोळी (रा. अमळथे, ता. नंदुरबार) आणि रिजवान सुभान खान (रा. मुजावर मोहल्ला, नंदुरबार) या दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, या रॅकेटमध्ये पालिकेतील दोन कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याने त्यांची कसून चौकशी सुरु आहे.
जुन्या रजिस्टरचा गैरवापर, नोंद नसतानाही दाखले तयार
पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींनी जुने, जीर्ण तसेच गहाळ झालेल्या जन्म नोंद रजिस्टरमधील नोंद क्रमांकांचा गैरवापर केला. प्रत्यक्षात जन्म नोंद अस्तित्वात नसतानाही त्या क्रमांकावर बनावट नोंदी तयार करून अधिकृत असल्याचा आभास निर्माण केला जात होता. बनावट शिक्के व खोट्या सह्या वापरून ही प्रमाणपत्रे अगदी अस्सल असल्यासारखी बनवली जात होती.
मोबाईलवर पाठवून होत होता गैरवापर
तयार केलेली बनावट जन्म प्रमाणपत्रे रिजवान खानच्या मोबाईलवर पाठवली जात, त्यानंतर त्यांचा वापर आधार कार्ड, शाळेचे दाखले, पासपोर्टसह इतर शासकीय कागदपत्रे काढण्यासाठी केला जात असल्याचेही तपासात उघड झाले आहे. यामुळे या प्रकरणाचा पसारा मोठा असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.
सात वर्षांचा काळा व्यवहार, मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता
हा बोगस धंदा गेल्या सात वर्षांपासून सुरु असल्याने आतापर्यंत किती बनावट प्रमाणपत्रे तयार झाली, त्यांचा वापर कुठे-कुठे झाला, याचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे. सायबर कॅफेतील संगणक, हार्डडिस्क, प्रिंटर तसेच बनावट शिक्के जप्त करण्यात आले असून आणखी आरोपी आणि सरकारी यंत्रणांतील दलाल अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रशासन हादरले, नागरिकांत संताप
नगरपालिकेच्या नावाने बनावट दाखले तयार होत असतील, तर प्रशासनावरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सामान्य नागरिकांनी कायदेशीर मार्गाने कागदपत्रे मिळवण्यासाठी धडपड करावी, आणि दुसरीकडे सायबर कॅफेमधून बोगस दाखले तयार होत असतील, तर हा प्रशासनिक यंत्रणेचा मोठा अपयश असल्याची चर्चा सुरु आहे.
पोलिसांनी या प्रकरणात आणखी गुन्हे दाखल करण्याचे संकेत दिले असून, नंदुरबारमधील हा बनावट दाखल्यांचा गोरखधंदा अजून किती खोल आहे, हे येत्या तपासातून उघड होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default