रक्तरंजित पंगत! लग्नाच्या जेवणातच चाकूचे सपासप वार; बुलढाण्यात थरारक हल्ला, आरोपी फरार

फुले शाहू आंबेडकर
0
बुलढाणा / प्रतिनिधी :  आनंद, जल्लोष आणि मंगलमय वातावरणात सुरू असलेला लग्नसोहळा क्षणात रक्तरंजित बनला! भर पंगतीत दोन तरुणांमध्ये जुना वाद चिघळला आणि एका तरुणाने दुसऱ्यावर चाकूने सपासप वार करत थरार उडवला. ही धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील कोलवड येथे घडली असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.


पंगतीत वाद, क्षणात हल्ला
गावातील एका लग्नसमारंभात गौरव जाधव हा तरुण उपस्थित होता. लग्नसोहळा आटोपल्यानंतर जेवणाची पंगत बसली असताना त्याचा गावतल्या नितीन सपकाळ या तरुणाशी शाब्दिक वाद झाला. काही दिवसांपूर्वी झालेल्या कावड यात्रेदरम्यान या दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्याच जुन्या वादाचा राग पंगतीत पुन्हा उफाळून आला.
सुरुवातीला किरकोळ बाचाबाची सुरू झाली; मात्र काही क्षणांत वातावरण तापलं. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, नितीन सपकाळ याने त्याच्यासोबत असलेल्या मयुरेश दसरकर याच्याकडील चाकू हातात घेतला आणि गौरव जाधववर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात गौरव कोसळल्याने लग्नमंडपात एकच गोंधळ उडाला.
गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
या हल्ल्यात गौरव जाधव गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाद सोडवण्यासाठी पुढे सरसावलेल्या काही पाहुण्यांनाही किरकोळ दुखापत झाली. अरुण जाधव यांनाही मार लागल्याचे समोर आले आहे.
सीसीटीव्हीत कैद झाला थरार
घटनेनंतर समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पंगतीत सुरू असलेला वाद, मध्यस्थीचा प्रयत्न आणि त्यानंतर झालेला अचानक हल्ला स्पष्ट दिसत आहे. काही क्षणांतच चाकूचे वार करून आरोपी घटनास्थळावरून पळ काढताना दिसतो. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली आहेत.
गुन्हा दाखल; आरोपींचा शोध सुरू
या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाणे येथे दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी विविध पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. जुना वाद आणि कावड यात्रेतील भांडण याचा तपासात विशेष तपास केला जात आहे.
गावात भीतीचे वातावरण
भर लग्नसमारंभात चाकूहल्ल्यासारखी गंभीर घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आनंदाचा सोहळा रक्तरंजित झाल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिले आहे.
तपास सुरू असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default