नाशिकमधील आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका गंभीर घटनेमुळे हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ८ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री सुमारे १ वाजता नांदूर नाका येथील मांगीर बाबा चौकात दोन गटांतील तृतीयपंथीयांमध्ये थेट हिंसक झटापट झाली. या प्रकरणी अनिकेत ऊर्फ डॉली वसंत म्हस्के (वय २१, रा. भालेराव मळा, नाशिकरोड) या तृतीयपंथीयाने दिलेल्या तक्रारीवरून शुभांगी रमेश शिंदे उर्फ सागर शिंदे आणि सोनू घुगे (दोघेही रा. नांदूर नाका) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
“पैसे देणे बंद केलेस, तर व्यवसाय करू देणार नाही”
फिर्यादीनुसार, संशयितांनी फिर्यादीकडे पैशांची मागणी करत, “तू आम्हाला पैसे देणे बंद केलेस, तुला इथे व्यवसाय करू देणार नाही,” अशी धमकी दिली. यानंतर शिवीगाळ, दमदाटी करत त्याला खाली पाडून हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
या प्रकरणी आडगाव पोलिसांनी दोन्ही संशयितांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेतले आहे. तपासात पुढील पुरावे हाती आल्यानंतर अटक करण्याची प्रक्रिया राबविली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
वसूली आणि ‘हुकूमशाही’चा वाद
नाशिक शहर व जिल्ह्यात सुमारे दीड हजारांहून अधिक तृतीयपंथीय असून नाशिक शहर व सिन्नर तालुक्यात मिळून सुमारे १५० च्या आसपास किन्नर कार्यरत आहेत. शिंदे टोलनाका, नांदूर नाका, सिन्नर परिसरात वसूली कोण करणार, जमा झालेल्या पैशांचा हिस्सा कोणाला आणि किती द्यायचा, यावरून अनेक दिवसांपासून वाद सुरू असल्याचे समोर आले आहे.
या वादात ‘गुरु आज्ञा’ पाळणे बंधनकारक असल्याचा दावा एका गटाकडून केला जात असताना, दुसरा गट याला थेट विरोध करत आहे. “हुकुमाखाली राहण्यास नकार दिल्यानेच आमच्यावर हल्ले होत आहेत,” असा आरोप दोन्ही गटांकडून परस्परविरोधात केला जात आहे.
दहाहून अधिक तक्रारी; पोलीस सतर्क
या प्रकरणाचा व्याप वाढत चालल्याने आडगाव, भद्रकाली, नाशिकरोड, सिन्नर आणि उपनगर पोलीस ठाण्यांत दहाहून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. हा विषय अत्यंत संवेदनशील असल्याने पोलीस याकडे विशेष सावधगिरीने पाहत असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
‘सलमा गुरु’वरही गंभीर आरोप
या संघर्षात आणखी एक खळबळजनक बाब समोर आली आहे. तृतीयपंथीयांची गुरु सलमा गुरु उर्फ सलीम हिच्यावर अन्याय व अत्याचार केल्याचा आरोप शुभांगी शिंदे हिने केला आहे. सलमा गुरु एककलमी निर्णय घेत असल्याने अनेक किन्नरांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
संघर्ष शमणार की चिघळणार?
गुरु कोणाला मानायचे, कुणाची आज्ञा पाळायची, वसूलीचे पैसे कुणाला आणि किती द्यायचे—या प्रश्नांवरून किन्नर समुदायातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांच्या जीवितास धोका असल्याचे आरोप होत असून, हा वाद हिंसक स्वरूप धारण करण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या सिन्नर, भद्रकाली, आडगाव आणि नाशिकरोड पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. हा संघर्ष नेमका कसा आणि केव्हा शमणार, याकडे संपूर्ण नाशिकचे लक्ष लागले आहे.

