एकाच वेळी आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत असली, तरी या घटनेभोवती संशयाचे गडद सावट पसरले आहे. ही सामूहिक आत्महत्या आहे की थंड डोक्याने रचलेला कट? असा सवाल आता नागरिकांमध्ये जोर धरू लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिलटदेव पाडा येथे आरती पावरा आपल्या दोन मुलांसह वास्तव्यास होती. अचानक तिघांनी विषारी औषध प्राशन केल्याची माहिती समोर आली. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र उपचारांदरम्यान आरती आणि चिराग यांचा मृत्यू झाला. रिहांशची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी धुळे येथे हलविण्यात आले.
‘आई असं करूच शकत नाही’ – नातेवाईकांचा आक्रोश
घटनेनंतर रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. माहेरच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत गंभीर आरोप केले आहेत. संबंधित पतीची ही सातवी पत्नी असल्याचा दावा करण्यात आला असून, यापूर्वी त्याच्या तीन पत्नींचेही संशयास्पद मृत्यू झाल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाने अधिकच गूढ रूप धारण केले आहे.
“मुलांवर जीवापाड प्रेम करणारी आई स्वतःच्या हाताने असा निर्णय घेईल, हे पटत नाही,” अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या असू शकते, असा संशयही बळावतो आहे.
पोलिसांची झडती; पती ताब्यात
घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून प्राथमिक तपास सुरू करण्यात आला आहे. संशयाच्या आधारे पतीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याची सखोल चौकशी सुरू आहे.
शवविच्छेदन अहवाल, विषतपासणी अहवाल आणि नातेवाईकांचे जबाब यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. घरगुती वाद, कौटुंबिक कलह किंवा इतर कोणता दबाव या घटनेमागे आहे का, याचाही तपास सुरू आहे.
गावात भीती आणि संतापाचे वातावरण
या घटनेनंतर भिलटदेव पाडा परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण आहे. सात विवाहांचा दावा, पूर्वीच्या पत्नींच्या मृत्यूबाबतचे आरोप आणि आता आई-मुलाच्या मृत्यूने अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवले आहेत.
ही घटना आत्महत्या की नियोजित हत्या? आईनेच लेकरांना विष दिलं की तिघांनाही विष देण्यात आलं? या प्रश्नांची उत्तरं आता पोलिस तपासातूनच समोर येणार आहेत.
दरम्यान, रिहांशच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी संपूर्ण गाव प्रार्थना करत आहे. या दुर्दैवी घटनेने शिरपूरसह संपूर्ण धुळे जिल्ह्याला हादरवून सोडले आहे.

