धुळे मार्गे गुजरातला दारूची तस्करी उघड!स्पेअर पार्टच्या आड १५ लाखांचा बिअर साठा जप्त, इंदूरचा चालक गजाआड

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे | प्रतिनिधी
गुजरात राज्यात बेकायदेशीर विक्रीसाठी धुळे मार्गे कंटेनरमधून नेला जाणारा तब्बल १५ लाख ३६ हजार रुपयांचा बिअर साठा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडाकेबाज कारवाईत जप्त केला आहे. या प्रकरणात ४० लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून इंदूर येथील चालकाला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे मद्यतस्करांच्या गोटात खळबळ उडाली आहे.
स्पेअर पार्टच्या नावाखाली दारूचा खेळ
धुळे शहरातील हिरे रुग्णालयासमोर एलसीबी पथकाने संशयावरून एक कंटेनर थांबवला. आर.जे. ५२ सी.एच. ३६३० क्रमांकाच्या या कंटेनरचा चालक अजय राजाराम वानखेडे (वय ५२, रा. इंदूर) याने वाहनात ‘स्पेअर पार्ट’ असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी कसून झडती घेतली असता, कंटेनरमध्ये ९,६०० बिअरचे टिन असलेले ४०० बॉक्स आढळून आले. कागदोपत्री स्पेअर पार्ट, प्रत्यक्षात मात्र मद्यतस्करीचा मोठा कट उघडकीस आला.
४० लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात
या कारवाईत पोलिसांनी
१५ लाख ३६ हजार रुपयांची बिअर,
२५ लाख रुपये किमतीचा कंटेनर,
मोबाईल फोन,
असा एकूण ४० लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
एलसीबीची धडाकेबाज कामगिरी
या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे व अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी पथकाचे कौतुक केले आहे.
ही कारवाई एलसीबीचे निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण पारधी, चेतन मुंडे, संजय पाटील, देवेंद्र ठाकूर, मयुर पाटील आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.
तस्करीचे धागेदोरे कुठे जातात?
धुळे शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही तस्करी कोणाच्या सांगण्यावरून आणि कोणासाठी केली जात होती, याचा तपास सुरू आहे. गुजरातमध्ये दारूबंदी असल्याने अशा प्रकारच्या तस्करीमागे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय पोलिस व्यक्त करत आहेत.
धुळे मार्गे सुरू असलेल्या मद्यतस्करीवर एलसीबीचा हा मोठा घाव मानला जात असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default