जैनकवाडी फाट्यावर रक्तरंजित धुमाकूळ
फिर्यादी विश्वराजे चंद्रशेखर पाटील हे सहकाऱ्यांसह मारुती सुझुकी कॅरी वाहनातून प्रवास करत असताना, जैनकवाडी फाट्याजवळ ६ ते ७ अनोळखी इसमांनी अचानक वाहन अडवले. हल्लेखोरांनी वाहनाच्या काचा फोडत कोयता व लोखंडी दांडक्याचा धाक दाखवून दहशत निर्माण केली.
याचवेळी फिर्यादीच्या डोक्यावर कोयत्याने वार करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले. लुटारूंनी बॅग, मोबाईल फोन, पॉवर बँक, एटीएम कार्ड व रोख रक्कम असा सुमारे १२ हजार २० रुपयांचा मुद्देमाल लुटून पलायन केले.
होमगार्डच्या माहितीवरून तातडीची हालचाल
टोळी रस्त्यावर धुडगूस घालत असल्याची माहिती होमगार्ड जवान सूर्यवंशी यांनी दिल्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. आरोपींचे वर्णन व वाहनांची माहिती मिळताच भिगवण, दौंड आणि यवत पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा देत संयुक्त शोधमोहीम सुरू करण्यात आली.
केडगाव चौफुला–सुपा रोडवर थरारक पाठलाग
मोटारसायकल व रिक्षाच्या मदतीने पळणाऱ्या आरोपींचा केडगाव चौफुला–सुपा रोडवर थरारक पाठलाग करण्यात आला. पोलिसांच्या चोख कारवाईत पाचपैकी चार आरोपी ताब्यात घेण्यात आले, तर एक आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाला.
याच टोळीने यापूर्वी कुरकुंभ येथील पेट्रोल पंपावरील सेल्समन रवींद्र महेश खडके यांच्यावरही कोयत्याने गंभीर वार केल्याचे उघड झाले आहे.
शस्त्रसाठा जप्त; पुण्यातील आरोपींची नावे उघड
अटकेतील आरोपींकडून तीन धारदार कोयते, एक मोठा बेसबॉल रॉड तसेच चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेले आरोपी :
कृष्णा राजू मोरे (मार्केट यार्ड)
रुपेश सुरेश आडवाल (कात्रज)
संकेत अनंत शिलते (पर्वती दर्शन)
ईश्वर महादेव मिसाळ (कात्रज)
पोलीस–नागरिक समन्वयातून यशस्वी कारवाई
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांच्या पथकाने केली.
यवत, भिगवण पोलीस पथकांसह निरगुडे, भिगवण व कुरकुंभ परिसरातील स्थानिक नागरिकांनीही आरोपी शोधण्यात मोलाचे सहकार्य केले.
रात्रीच्या प्रवासात सावधान!
या घटनेनंतर भिगवण–बारामती रोडवर भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून लवकरच त्यालाही जेरबंद करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
खाकीचा इशारा स्पष्ट आहे – रस्त्यावर दहशत माजवणाऱ्यांना अजिबात माफी नाही!

