सोशल मीडियावरील ओळखी किती भयावह वळण घेऊ शकतात, याचं अंगावर काटा आणणारं प्रकरण नंदुरबार जिल्ह्यात उघडकीस आलं आहे. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणीचे अश्लील फोटो व व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करत सातत्याने धमकावणाऱ्या नराधमाला अखेर पोलिसांनी पुणे-शिरपूर बसस्थानकावर फिल्मी स्टाईलने बेड्या ठोकल्या.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बोरफळी (पोस्ट – मेलाने) येथील चुनीलाल उर्फ गणेश भोग्या पावरा (वय २७) याने २० वर्षीय पीडित तरुणीला प्रेमाच्या बहाण्याने विश्वासात घेतले. १४ ऑगस्ट २०२५ ते ४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत तिच्यासोबत काढलेले खासगी व अश्लील व्हिडीओ-छायाचित्रे त्याने सोशल मीडियावर प्रसारित केली. एवढ्यावरच न थांबता इंटरनेटच्या माध्यमातून तिचा पाठलाग, धमक्या आणि मानसिक छळ सुरूच ठेवला.
दररोजच्या धमक्यांनी त्रस्त झालेल्या तरुणीने अखेर हिम्मत दाखवत म्हसावद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७८ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून म्हसावद पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कामे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना आरोपी पुण्यात असल्याची माहिती निष्पन्न झाली. पीडितेच्या मदतीने सापळा रचण्यात आला आणि आरोपीला पुण्याहून शिरपूरकडे येण्यास भाग पाडण्यात आले.
आरोपी येणार असल्याची खात्री होताच, शिरपूर बसस्थानकावर पहाटेपासून पाळत ठेवण्यात आली. रात्रभर मोबाईल लोकेशनवर नजर ठेवून सकाळी ६ वाजता चोपडा-शिरपूर बसमधून उतरत असतानाच चुनीलाल उर्फ गणेश पावरा याला फिल्मी स्टाईलने अटक करण्यात आली. पुढील चौकशीसाठी त्याला शहादा येथे नेण्यात आले.
कसून चौकशीत आरोपीवर यापूर्वी अडावद पोलीस ठाणे, जि. जळगाव येथे चोरीचा गुन्हा दाखल असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. पोलिसांकडून आरोपीच्या मोबाईल व डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू असून, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
