मिळालेल्या माहितीनुसार, सोनू पाटील उर्फ कुणाल श्रीधर देसाई (वय २९) हा एसटी विभागात कर्मचारी असून अविवाहित आहे. संबंधित चिमुकली त्याच्या घराजवळ राहत होती आणि निरागसपणे खेळण्यासाठी त्याच्या घरी जात असे. काही दिवसांपूर्वी अचानक चिमुरडीला ताप, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. तिच्या वागण्यातही बदल जाणवत असल्याने पालकांनी चौकशी केली असता, चिमुरडीने आरोपीकडे बोट दाखवत इशाऱ्याने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
घडलेल्या प्रकाराने हादरलेल्या पालकांनी तात्काळ तिला वैद्यकीय तपासणीसाठी दाखल केले. तपासणीनंतर धक्कादायक बाब उघडकीस आली. पुढील उपचारासाठी चिमुरडीला धुळे येथे हलवण्यात आले असून सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अमळनेर येथून ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणाचा तपास पीएसआय सुरेश सोनवणे करत असून पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे. घटनेमुळे शिरपूर शहरात संतापाची लाट उसळली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
निरागस बालिकांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांमुळे समाजमन हादरले असून, अशा प्रवृत्तींना कठोर शिक्षा देण्याची वेळ आल्याची भावना व्यक्त होत आहे.

