सह परिवहन आयुक्त (संगणक विभाग) शैलेश कामत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले की, परिवहन विभागाच्या नावाने बनावट वेबसाइट्स व अनधिकृत मोबाईल ॲप्स तयार करून वाहनधारकांची दिशाभूल केली जात आहे. ‘तुमचे ई-चलन थकीत आहे’, ‘तत्काळ दंड भरा अन्यथा परवाना निलंबित केला जाईल’ अशा मजकुराचे एसएमएस किंवा व्हॉट्सॲप संदेश पाठवून नागरिकांना भीती दाखवली जाते आणि त्यामधील लिंकवर क्लिक करण्यास भाग पाडले जाते.
बनावट ॲप्सचा सापळा
“RTO Services.apk”, “mParivahan_Update.apk”, “E-Challan_Pay.apk” यांसारख्या नावांनी बनावट अनुप्रयोग प्रसारित केले जात असून ते डाउनलोड करताच मोबाईलमधील बँकिंग माहिती, ओटीपी, आधार क्रमांक, पॅन क्रमांक यांसारखी संवेदनशील माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती जाते. काही प्रकरणांमध्ये थेट बँक खात्यातून रक्कम वळविल्याचेही निदर्शनास आले आहे.
परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, विभागाकडून कधीही व्हॉट्सॲप, एसएमएस किंवा इतर कोणत्याही मोबाईल ॲपद्वारे पैसे भरण्यासाठी लिंक पाठविली जात नाही.
फक्त “gov.in” संकेतस्थळांवरच विश्वास
वाहन नोंदणी, वाहनचालक परवाना, परवाना नूतनीकरण किंवा ई-चलन भरण्यासाठी नागरिकांनी केवळ अधिकृत शासकीय संकेतस्थळांचा वापर करावा. ही संकेतस्थळे “gov.in” या विस्ताराने समाप्त होतात. “.com”, “.online”, “.site”, “.in” अशा इतर विस्तारांवरील संकेतस्थळे उघडण्यापूर्वी खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
फसवणूक झाल्यास काय कराल?
सायबर फसवणुकीचा बळी ठरल्यास नागरिकांनी तात्काळ राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल वर तक्रार नोंदवावी किंवा १९३० या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच जवळच्या सायबर पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल करता येईल.
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम यांनी सांगितले की, “कोणत्याही संशयास्पद दुव्यावर क्लिक करू नका. अधिकृत माहितीची खात्री संबंधित RTO कार्यालयाकडूनच करून घ्या. नागरिकांनी जागरूक राहिल्यास अशा सायबर टोळ्यांचे डाव उधळून लावणे शक्य आहे.”
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना
अनोळखी क्रमांकावरून आलेल्या लिंकवर क्लिक करू नका
ओटीपी, बँक तपशील, आधार क्रमांक कोणालाही देऊ नका
मोबाईलमध्ये अनधिकृत ॲप्स डाउनलोड करू नका
अधिकृत व्यवहार करताना वेबसाइटचा विस्तार तपासा
संशयास्पद संदेश त्वरित सायबर पोलिसांना कळवा
सायबर गुन्हेगारांनी आता वाहनधारकांना लक्ष्य करत डिजिटल सापळे रचले आहेत. एका क्लिकमुळे आयुष्यभराची कमाई धोक्यात येऊ शकते. त्यामुळे “सावध राहा, सुरक्षित राहा” हा मंत्र अंगीकारणे हीच काळाची गरज असल्याचे RTO प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

