बनावट कागदपत्रांच्या जोरावर तब्बल १४ लाख ८७ हजार रुपयांचे शेती कर्ज उचलून स्टेट बँक ऑफ इंडियाची फसवणूक करणारा संशयित अखेर चार वर्षांनंतर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पिंपळगाव बसवंत पोलिसांनी (Pimpalgaon Baswant Police) शिताफीने सापळा रचत कैलास रामचंद खोडे याला अटक केली असून, न्यायालयाने त्यास शुक्रवारपर्यंत (दि. ६) पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित कैलास खोडे याने २३ मे २०२२ रोजी पिंपळगाव बसवंत येथील SBI शाखेतून पीक कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड न झाल्याने बँकेने खात्याची सखोल तपासणी केली. या चौकशीत कर्ज मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रे, चुकीची माहिती आणि बनावट दाखले सादर करण्यात आल्याचे उघडकीस आले.
या प्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गुन्हा दाखल होताच संशयिताने ओळख लपवून फरारी पत्करली. दरम्यान, तो सोहन सिटी परिसरात वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती पिंपळगाव पोलिसांना मिळाली.
ही माहिती खात्रीशीर असल्याचे लक्षात येताच पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज निकम, हवालदार संतोष ब्राह्मणे, पोलीस नितीन गाढवे आणि चालक रामभाऊ वायकांडे यांच्या पथकाने सोहन सिटी येथे सापळा रचला. योग्य क्षणी कारवाई करत संशयिताच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पंकज निकम करत असून, संशयिताने आणखी कोणत्या बँकांची किंवा आर्थिक संस्थांची फसवणूक केली आहे का, याचा शोध घेण्यात येत आहे. बँकिंग क्षेत्रातील फसवणूक रोखण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
