‘के-३२ टॉवर’वर डोळा, कॉपरवर हात साफ करण्याचा प्रयत्न
प्राथमिक माहितीनुसार, प्रकल्पातील ‘के-३२ टॉवर’ येथील कॉपर केबल कापून आर्थिक लाभ मिळवण्याचा डाव आखण्यात आला होता. चोरीसाठी गॅस कटरचा वापर करण्यात आल्याचे उघड झाले आहे. उच्च सुरक्षा असलेल्या प्रकल्पातच अशा प्रकारे नियोजनबद्ध कट रचला गेल्याने अंतर्गत संगनमताची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
कंपनी अधिकाऱ्यांनाच अटक
कंपनीचे उत्तर महाराष्ट्र सुरक्षा प्रमुख रमेश विठ्ठल मोहिते यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये ब्रिजेश कुमार मनीष द्विवेदी व ज्ञानेश्वर झुलाल पिंपळे (दोघेही कंपनी अधिकारी) यांच्यासह निलेश पाटील, इकबाल जॅकेट चव्हाण, घनश्याम उर्फ गणेश रवींद्र अहिरराव, विकास उर्फ विकी गोकुळ मालचे, सुरेश जिभाऊ थोरात व मनोहर रोहिदास बागुल यांचा समावेश आहे.
यापैकी ब्रिजेश द्विवेदी व ज्ञानेश्वर पिंपळे यांना पहाटे अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पथके रवाना करण्यात आली आहेत.
मुद्देमाल जप्त; सीसीटीव्ही तपासणी सुरू
अटकेत असलेल्या आरोपींकडून गॅस कटर, कॉपर वायर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. जप्त मालाची अचूक किंमत किती, तसेच यापूर्वीही अशाच प्रकारे साहित्य चोरी झाले आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे. घटनास्थळाची पाहणी, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
औद्योगिक वर्तुळात खळबळ
कंपनीतीलच अधिकाऱ्यांचा सहभाग समोर आल्याने औद्योगिक क्षेत्रात सुरक्षा व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कंपनी प्रशासनानेही स्वतंत्र अंतर्गत चौकशी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, निजामपूर परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून प्रकल्प परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्यात आली असून फरार आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
औद्योगिक सुरक्षेतील ‘इनसाईड जॉब’चा हा प्रकार किती खोलवर रुजलेला आहे? तपासात आणखी कोणती धक्कादायक माहिती समोर येणार? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे

