सामाजिक परिवर्तन, विद्रोही साहित्य आणि लोकशाही मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या या सोहळ्यामुळे शिरपूरातील साहित्यिक, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
या भव्य सत्कार सोहळ्यात शिरपूरच्या प्रसिद्ध साहित्यिका व प्राचार्या सारिका ताई रंधे या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. विद्रोही साहित्याच्या परंपरेचा इतिहास, त्यातील संघर्ष आणि आजच्या सामाजिक वास्तवावर त्या आपल्या विचारांची प्रभावी मांडणी करणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्रोही साहित्य आणि संस्कृती संमेलन 2006 व 2011 चे कार्याध्यक्ष तसेच सत्यशोधक डेमोक्रॅटिक पार्टीचे सचिव कॉम्रेड सिद्धार्थ जगदेव उपस्थित राहणार असून त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून विद्रोही चळवळीच्या पुढील वाटचालीचा रोडमॅप मांडला जाणार आहे.
हा कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकर सभागृह, खालचे गाव, शिरपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. समाजपरिवर्तनाच्या विचारांची मशाल पेटती ठेवण्यासाठी हा सोहळा महत्त्वाचा ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सत्यशोधक जन आंदोलनाचे पूर्णवेळ कार्यकर्ते तसेच ‘मासिक सत्यशोधक प्रतिशब्द’चे संपादक प्रा. कचरू अहिरे यांनी तालुक्यातील सर्व नागरिकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
“अहिराणी, मराठी आणि आदिवासी समाजातील साहित्यिक, दलित-बहुजन चळवळीतील कार्यकर्ते, विद्यार्थी, शिक्षक तसेच प्रगतिशील विचारांचे नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक सत्कार सोहळ्याचे साक्षीदार व्हावे,” असे आवाहन प्रा. कचरू अहिरे यांनी केले आहे.
