शिक्षण क्षेत्रात वाढत चाललेल्या शुल्कवाढी, शिष्यवृत्तीतील विलंब, रिक्त प्राध्यापक पदे आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांकडे होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात धुळे शहरात विद्यार्थ्यांचा संताप रस्त्यावर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) धुळे शाखेच्या वतीने गुरुवारी भव्य ‘विद्यार्थी आक्रोश मोर्चा’ काढत शिक्षणाच्या वाढत्या बाजारीकरणाविरोधात जोरदार आवाज उठवण्यात आला.
शासनाने विद्यार्थ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे तात्काळ गांभीर्याने लक्ष न दिल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
हा मोर्चा शहरातील मा. ध. पालेशा महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. कृषी, आयटीआय, वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र तसेच विविध शैक्षणिक संस्थांतील शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात बॅनर-फलक आणि तोंडावर घोषणांचा गजर करत विद्यार्थ्यांनी शिक्षणव्यवस्थेतील गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांनी “शिक्षण हक्क आमचा – नाही कुणाच्या बाजाराचा”, “शुल्कवाढ बंद करा”, “शिष्यवृत्ती तात्काळ द्या” अशा घोषणा देत वातावरण दणाणून सोडले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभाविपच्या शिष्टमंडळाने प्रशासनाला निवेदन सादर करत राज्यातील शिक्षणव्यवस्थेतील २२ महत्त्वाच्या समस्यांकडे लक्ष वेधले.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या
अभाविपने निवेदनाद्वारे शासनासमोर अनेक ठोस मागण्या मांडल्या. त्यामध्ये —
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करावे.
सर्व स्पर्धा परीक्षांचे शुल्क कमी करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.
विद्यार्थिनींच्या मोफत शिक्षणाच्या घोषणेची प्रभावी अंमलबजावणी करावी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथील परीक्षा व निकालातील गोंधळ तात्काळ थांबवावा.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील रिक्त प्राध्यापक पदे भरून परीक्षा शुल्क कमी करावे.
इंटर्न्स व रेसिडेंट डॉक्टरांना स्टायपेंड वाढवून आर्थिक दिलासा द्यावा.
प्रलंबित शिष्यवृत्ती, विद्यावेतन व निर्वाह भत्ता तातडीने विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करावा.
शासकीय वसतिगृहे, आयटीआय इमारती आणि उपकरणांचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करावे.
एमएचसीआयटीसाठी एकच अर्ज प्रक्रिया, कमी शुल्क आणि सुलभ प्रणाली लागू करावी.
महाविद्यालयीन खुल्या विद्यार्थी निवडणुका तात्काळ सुरू कराव्यात.
मराठी माध्यम शाळांची गुणवत्ता वाढवावी.
ग्रामीण विद्यार्थ्यांना मोफत बस पास द्यावा.
आयटीआय विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता त्वरित सुरू करावा.
पशुवैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी अंतनिर्वाह भत्ता व अधिछात्रवृत्ती लागू करावी.
कृषी विद्यापीठातील रिक्त पदे तातडीने भरावीत.
“विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने दुर्लक्ष करू नये”
अभाविप देवगिरी प्रदेश सहमंत्री सुशांत एकोर्गे यांनी सांगितले की, राज्यातील विविध विद्याशाखांतील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. परीक्षा शुल्कवाढ, शिष्यवृत्तीतील विलंब, रिक्त पदांमुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम तसेच ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या अडचणींमुळे शिक्षणव्यवस्था कमकुवत होत आहे.
शासनाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केवळ घोषणा न करता ठोस धोरणात्मक निर्णय घेऊन तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा अभाविप राज्यव्यापी आंदोलन उभारेल, असा इशाराही त्यांनी दिला.
धुळे शहरमंत्री कुमारी मयुरी जाधव म्हणाल्या की, सरकारकडून विद्यार्थ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या जातात; मात्र त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही. विद्यार्थिनींचे मोफत शिक्षण असो किंवा आयटीआयचे विद्यावेतन, विद्यार्थ्यांना केवळ आश्वासने नव्हे तर प्रत्यक्ष निर्णय आणि कृती अपेक्षित आहे.
पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या मोर्चात जिल्हा संयोजक लहानु कोळेकर, शिरपूर शहरमंत्री रुपेश कोष्टी, दोंडाईचा शहरमंत्री हिमांशू चित्ते, मोर्चा प्रमुख मनिष कुलकर्णी तसेच विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चा शांततेत पार पडला असला तरी विद्यार्थ्यांचा संताप स्पष्टपणे दिसून आला. शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास राज्यभर तीव्र विद्यार्थी आंदोलन पेटू शकते, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.

