जालन्यात भीषण अपघात:भरधाव कारच्या धडकेत मंडप व्यावसायिकाचा अंत; रावसाहेब दानवेंच्या पीएची कार असल्याची चर्चा

फुले शाहू आंबेडकर
0
जालना जिल्ह्यातील भोकरदन–जाफ्राबाद मुख्य मार्गावरील विरेगाव येथे एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या व्यक्तीस जोराची धडक दिली. या भीषण अपघातात विरेगाव येथील प्रसिद्ध मंडप व्यावसायिक विलास सिताराम दळवी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण विरेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विलास दळवी हे विरेगाव येथील रहिवासी असून ते मंडप व जनरेटर व्यवसायाच्या माध्यमातून सर्वपरिचित होते. नेहमीप्रमाणे कामानिमित्त ते जाफ्राबाद–भोकरदन मार्गावर रस्त्याच्या कडेला उभे होते. त्याच वेळी जाफ्राबादकडून भोकरदनच्या दिशेने येणाऱ्या एका भरधाव कारने (क्रमांक एमएच 20 बीवाय 9908) त्यांना भीषण धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, दळवी यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान मृत्यू अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने दळवी यांना भोकरदन येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. दुर्दैवाने, पुढील उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. या अपघातातील कार भाजप नेते तथा माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे स्वीय सहाय्यक गजानन तांदूळजे यांची असल्याची माहिती प्राथमिक स्तरावर समोर येत आहे. मात्र, अपघाताच्या वेळी कार नेमका कोण चालवत होते, याबाबत पोलिसांकडून अधिकृत तपास सुरू आहे. गावावर शोककळा घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त कार जप्त केली आहे. विलास दळवी यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता विरेगाव येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत असून, दोषी चालकावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default