मिळालेल्या माहितीनुसार, मुंतरीन (नाव बदललेले) हिचा विवाह वसीम (नाव बदललेले) याच्यासोबत सुमारे ११ महिन्यांपूर्वी झाला होता. सात दिवसांपूर्वी तिने एका खासगी रुग्णालयात गोंडस मुलीला जन्म दिला. कुटुंबाला मुलगा होईल अशी अपेक्षा होती. मात्र मुलगी झाल्यामुळे सासरच्या मंडळींमध्ये नाराजी पसरल्याचा आरोप आहे.
सोमवार, २३ मार्च रोजी टाके काढण्यासाठी मुंतरीन रुग्णालयात आली होती. तिच्यासोबत आई-वडीलही उपस्थित होते. हॉस्पिटलचे बिल भरण्याच्या दरम्यान पती व त्याच्या कुटुंबीयांनी मुलगी झाल्याबाबत टोमणे मारल्याचे सांगितले जाते. काही दिवस माहेरी जाण्याची विनंती करताच वातावरण चिघळले.
हॉस्पिटलसमोरच राडा, सर्वांसमोर मारहाण
आरोपानुसार, पती आणि त्याच्या भावांनी महिलेवर हात उचलला. एवढेच नव्हे तर बचावासाठी पुढे आलेल्या तिच्या आई-वडिलांनाही मारहाण करण्यात आली. नवजात बाळाला घेऊन महिलेला रुग्णालयाच्या बाहेर जाण्यास भाग पाडल्याचे सांगितले जाते.
सर्वाधिक संतापजनक बाब म्हणजे, “मुलीला तीन लाखात विकून टाक” असा अमानुष सल्ला दीराने दिल्याचा आरोप पीडितेने केला आहे. हा प्रकार समोर येताच परिसरात मोठी खळबळ उडाली. काही वेळ हॉस्पिटल परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. बघ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
पोलिसांची कारवाई
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक चौकशीनंतर पती व कुटुंबातील काही सदस्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सूनेला शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक छळ केल्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. वैद्यकीय अहवाल, साक्षीदारांचे जबाब आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
समाजाला प्रश्न विचारणारी घटना
एकीकडे मुलीला ‘लक्ष्मी’ मानण्याची परंपरा सांगितली जाते, तर दुसरीकडे अशा विकृत मानसिकतेचे प्रकार समाजात अद्याप जिवंत असल्याचे या घटनेतून दिसून येते. मुलगी जन्माला आली म्हणून महिलेला अपमानित करणे, मारहाण करणे आणि नवजात बाळाच्या भवितव्यावर बोली लावण्याची भाषा करणे—ही केवळ कौटुंबिक वादाची बाब नसून गंभीर गुन्ह्याच्या चौकटीत मोडणारी बाब आहे.
कायदेशीर पैलू
तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारात महिलांवरील अत्याचार, घरगुती हिंसाचार, तसेच नवजात बालिकेच्या हक्कांवर गदा आणणारे गंभीर गुन्हे लागू होऊ शकतात. जर हुंडा किंवा मुलगा जन्माला न आल्यामुळे छळ केल्याचे सिद्ध झाले, तर संबंधितांवर कडक कारवाई होऊ शकते.
या प्रकरणाने पुन्हा एकदा समाजातील स्त्रीभ्रूणहत्या, लिंगभेद आणि महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. पोलिस तपासानंतर सत्य समोर येईलच; मात्र मुलगी जन्माला आली म्हणून तिच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी मानसिकता कधी बदलणार? हा सवाल समाजासमोर उभा राहतो.
