धुळे हादरलं! भररस्त्यात शिक्षकाला मारहाण करत ४३ हजारांचा मुद्देमाल लंपास; दोन सराईतांना बेड्या

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे (प्रतिनिधी) – शहरातील गजबजलेल्या रस्त्यावर एका धार्मिक मदरसा शिक्षकाला अडवून मारहाण करत रोकड व घड्याळ हिसकावणाऱ्या दोघा संशयितांच्या मुसक्या अखेर आवळण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. अवघ्या काही दिवसांत गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून या धडाकेबाज कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.
भररस्त्यात थरारक प्रकार
१८ मार्च रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास पोलिस मुख्यालयाजवळील रस्त्यावर हा प्रकार घडला. धार्मिक मदरसा शिक्षक महंमद नसीम महंमद हनीफ (वय ४३) हे रिक्षातून जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवले. क्षणार्धात त्यांना रिक्षाबाहेर ओढत मारहाण करण्यात आली. प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी जबरदस्तीने त्यांच्याकडील रोकड आणि मनगटी घड्याळ हिसकावून पळ काढला.
घटनेनंतर शहर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
शोधपथकाची सापळा रचना; आरोपी जेरबंद
गुन्ह्याच्या तपासासाठी शहर पोलिस ठाण्याच्या शोधपथकाने तात्काळ हालचाली सुरू केल्या. सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्यात

आली.
त्यानुसार राहुल ऊर्फ टप्या बाबू ऊर्फ गजानन शेरात (वय २८, रा. रंगळी चाळ, चितोड रोड) आणि मनोज ऊर्फ भुऱ्या गोरख शेरात (वय ३५, रा. विठ्ठलनगर, चितोड रोड) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
४३ हजारांचा मुद्देमाल जप्त
आरोपींकडून रोकड, मनगटी घड्याळ आणि गुन्ह्यात वापरलेली स्कूटी असा एकूण ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या कारवाईनंतर परिसरात पोलिस गस्त वाढवण्यात आली आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दीपक पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक शत्रुघ्न पाटील, समाधान सोळंके यांच्यासह शोधपथकातील अधिकाऱ्यांनी ही कारवाई पार पाडली.
नागरिकांना आवाहन
भररस्त्यातील जबरी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहावे, संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
धुळे शहर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारीला चाप बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default